By निवेदिता मदाने-वैशंपायन
Twitter : @NiveditaMW
नवी दिल्ली
राजधानी दिल्ली आणि परिसर सध्या यमुनेला आलेला पूर ते पाऊसाळी ‘मान्सून’ अधिवेशन सत्रातील वेगवेगळ्या विधेयकांची मंजूरी ते वादग्रस्त विषयांवर विरोधकांचा गोंधळ, सभात्याग हा सगळ्यांच्याच चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरत आहे. राजधानी दिल्ली प्रशासन, सरकार, सत्तेचं जसं आकर्षण आहे तसंच साहित्य जगत् आणि मराठी भाषेतील साहित्यिक कार्यक्रमांचही आहे. याची अनुभूती अनेकदा बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणूस घेत असतो.
अलिकडेच ‘साहित्य यात्री’ हा दिल्लीतील स्थानिक कलाकारांनी वनिता समाजात साहित्य दिंडी, वाचन संस्कृती वाचवण्यासाठी केलेल्या कार्यक्रमानंतर अगदीच दोन – तीन दिवसात दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंबई येथील सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका साहित्यिक मधूरा वेलणकर आणि कलाकारांचा बोरु ते ब्लॉग ‘मधूरव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खरं तर आजही मराठी भाषेला बहूप्रतिक्षित ‘अभिजात भाषेचा दर्जा’ कधी आणि केव्हा मिळणार हा तसा आजही केंद्र सरकारच्या दरबारातील कळीचाच मुद्दा आहे. (असो)
सध्या बदलत्या काळानुसार पुढच्या पिढीत नित्याच्या व्यवहारात मातृभाषेविषयी आलेली उदासीनता आणि राजदरबारातील मातृभाषेला असलेलं स्थान लक्षात घेऊन, अशा स्थितीत मातृभाषा मराठीला महाराष्ट्रातच मर्यादित न ठेवता राज्याबाहेर राजधानीत मराठीचा वावर वाढावा, तात्काळ राजभाषेचा दर्जा मिळावा याकरिताचे प्रयत्न दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे सगळेच कार्यकर्ते निष्ठेने करत आहेत. याचाच एक भाग म्हणून मान्सून सत्राला महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातून लोकप्रतिनिधींची उपस्थिती सध्या राजधानीत आहे. तेव्हा सुरुवातीला महाराष्ट्रासोबतच बृहन्महाराष्ट्रीयन मराठी माणसाची मातृभाषा मराठी भाषेविषयीची अस्मिता खासदारांपर्यंत पोहचवून पुढे त्यांच्या माध्यमातून राज दरबारी मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीचा हा आणखी हा एक अनोखा प्रयत्न होता.
मराठी रंगभूमी ही जितकी समृद्ध तितकीच संवेदनशील आहे, हे दिग्गज कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या दुर्दैवी अंताने जगापुढे आले, तर श्रेष्ठ कवी, गीतकार ना. धो. महानोर यांच्या त्याच दरम्यानच्या निधनाच्या वृत्ताने दिल्लीतील नियोजित आणि आतुरतेने प्रतिक्षित कार्यक्रमाच्या प्रस्तुतीविषयी थोडी साशंकता निर्माण झाली होती. सरकार कुठलं ही असो, मराठी भाषा आणि तिचं शासन दरबारी असलेलं महत्व लक्षात आणून देण्याच्या प्रयत्नातात कला दिग्दर्शक नीतीन देसाई यांच्या मृत्यूच्या घटनेची नोंद ही आणखी एक ‘आहूती’ समजून आणि…
“या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे…”! या अजरामर काव्यपंक्तीचें निर्माते श्रेष्ठ कवी ना. धो. महानोर यांना दिल्लीकर मराठी जनतेने श्रध्दांजली अर्पण करून सुरुवात झाली – एका अभिनव रौप्यमहोत्सवी प्रयोगाची!
मराठी रंगभूमीवर नेहमीच नवनवीन प्रयोग सादर केले जातात. तसे ते यशस्वी ही होतात याचीच साक्ष देणारी एका वेगळ्या धाटणीची कलाकृती होती ‘मधुरव- बोरू ते ब्लॉग’ याच्या २५ व्या प्रयोगाची प्रस्तुती! या कलाकृतीतून प्रेक्षकांना मराठी भाषेची सांगीतिक आख्यायिका अनुभवता आली. यापूर्वी मुंबईत राजभवन, गेटवे ऑफ इंडिया अशा ऐतिहासिक वास्तूंमध्ये ‘मधुरव- बोरू ते ब्लॉग’ चे प्रयोग झाले. त्याचा रौप्य महोत्सवी प्रयोग नुकताच राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात संपन्न झाला. त्यानिमित्त अभिनेत्री मधुरा वेलणकर- साटमशी संवाद साधता आला. यात ‘मधुरव-बोरू ते ब्लॉग’ च्या जन्माची कथा त्यांनी सांगितली.
विशेषतः लॉकडाउनमधील वेळ मराठीतील नव्या प्रयोग निर्मितीकरिता आणि आपली मातृभाषा मराठी तिच्याविषयीचं प्रेम, उत्सुकता, अनेकांना असलेलं अज्ञान, मराठी भाषेचा कसा जन्म झाला? तिचा इतिहास, वेगवगेळी स्थित्यंतरं याबद्दल नसलेल्या माहितीचा शोध, संदर्भ अभ्यास करून मिळवले. ज्या भाषेत आपण शिकतो, असंख्य कलाकृती पाहतो, त्या भाषेची गोष्ट, तिचं सौंदर्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं या कल्पनेतून मधुरवचा खरं तर जन्म झाल्याचे सांगितले. पुस्तक वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघून अनुभवणं लोकांना जास्त आवडतं, त्यामुळे पुस्तकरूपात मराठीची गोष्ट न सांगता, मनोरंजनात्मक तरीही प्रबोधन करणाऱ्या कलाकृतीतून सांगायचं ठरवलं आणि ‘मधुरव- बोरू ते ब्लॉग’ ही कलाकृतीची निर्मिती झाली.
‘मधुरव- बोरू ते ब्लॉग’ ही नेहमीच्या साचेबद्ध कलाकृतींपेक्षा निश्चितच आगळीवेगळी कलाकृती भासली. यात नृत्य, नाट्य, संगीत या सगळ्याचाच मिलाफ अनुभवता आला आणि बृहन्महाराष्ट्रीयन प्रेक्षकांच्या मनाला देखील तो तितकाच भावला. मधुरवच्या प्रयोगादरम्यान मधुरवने त्यांच्याच कुटुंबाचा एक भाग करून घेत प्रेक्षकांशीदेखील संवाद साधला. या कलाकृतीच्या लेखनात आणि संशोधनात समीरा गुजर-जोशीचा तितकाच मोठा वाटा आहे. मधुरवमधून आपल्यापर्यंत पोहचत असलेल्या बऱ्याच गोष्टी साहित्यप्रेमी आणि मराठी भाषिक असूनही अनेकांना माहीत नव्हत्या, इतकेच नव्हे तर प्रेक्षकांकडूनही मराठी भाषेबद्दल माहीत नसलेल्या नवनवीन गोष्टी मधूरवने माहिती करून घेतल्या.
प्रयोगापूर्वी काहीसा साशंक आणि अनभिज्ञ असलेला प्रेक्षक नाटक संपल्यावर प्राचीन मराठी साहित्य आणि मातृभाषेतील बाराखडीसहितचे बारकावे समजून घेऊन, ज्ञानवर्धन करुनच घरी पोहचलो. दरम्यान, प्रयोगाच्या मध्यतंरात आयोजकांनी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांपेक्षाही अभिप्राय जाणून घेण्यासाठी विशेष ध्वनीचित्रमुद्रणाची व्यवस्था ही केली होती. यात विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ, प्रशासक ते राजकीय, सामाजिक नेत्यांनी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया अभिप्राय स्वरूपात नोंदवल्या. यात वरिष्ठ काँग्रेसी नेते खासदार श्रीनिवास पाटील ते सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया निश्चितच उर्जा देणाऱ्या होत्या. याशिवाय महिला खासदारांची उपस्थिती, केंद्रीय मंत्री, एक माजी राज्यपाल यांची उपस्थिती लाभणे ही दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या प्रत्येक उत्साही कार्यकर्त्याच्या कार्याला मिळालेली (मुद्दाम प्रतिष्ठानच्या प्रथेनुसार आणि जागेअभावी नामोल्लेख करत नाही)
यापूर्वीच्या दिवाळी पहाट, राजा शिव छत्रपती नाट्य प्रस्तुतीच्या यशस्वी आयोजनाची ही पावतीच म्हणता येईल. मधुरवमध्ये नाविन्य आणि अनुभवाची सांगड घालताना तरुण कलाकारांची भूमिका महत्त्वाची आहे. विशेषतः जुई भागवत, आकांक्षा गाडे, आशिष गाडे या तरुणांची मराठी भाषेविषयीची तडफ तितकीच बोलकी आहे.
मराठी भाषेतला किंवा मराठी नाट्य क्षेत्रातला हा एक अभिनव प्रयोग, इतक्या मर्यादित दृष्टिकोनातून या कार्यक्रमाकडे पाहायला नको. मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा यासाठी मराठीची माहिती, महती कळावी आणि मराठीवरचं प्रेम, मराठीचं कौतुक, मराठीचा अभिमान लोकांमध्ये जागृत व्हावा यासाठी उचललेलं एक पाऊल आहे. अनेक माहीत नसलेल्या भाषेविषयीच्या गोष्टी कलेच्या माध्यमातून या कार्यक्रमांमध्ये उलगडत गेल्या, त्यामुळे हा कार्यक्रम तितकाच महत्त्वपूर्ण ठरला.