X : Rav2Sachin

मुंबई: अग्निशमन दलाच्या (BMC Fire Brigade) अग्निशामक पदाची भरती प्रक्रिया (recruitment) संपल्यानंतरही बनावट भरती प्रक्रियेत वैद्यकीय तपासणीच्या (medical examination) पत्रावर प्रमुख अग्निशमन अधिकारी यांची स्वाक्षरी आढळून आली आहे. मात्र ‘ही स्वाक्षरी मी केलेली नाही’, असे माजी प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी maharashtra.city शी बोलताना सांगितले. तसेच ही स्वाक्षरी नेमकी कोणी केली, याचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणी मांजरेकर यांनी केली आहे. यामुळे या प्रकरणात आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भरती प्रक्रिया दरम्यान मांजरेकर हे प्रमुख अग्निशमन अधिकारी पदावर कार्यरत होते.

दरम्यान, आग्रीपाडा पोलीस ठाण्यात (Agripada Police Station) विभागीय अग्निशमन अधिकारी रमेश भोर यांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी तत्कालीन मुख्य लिपिक मनीष पाटील, रुपेश पाटील, कुर्ला अग्निशमन केंद्रातील अग्निशमन दतात्रय पवार, अंधेरी अग्निशमन केंद्रातील यंत्रचालक देवीदास वाघमारे आणि पालिका सुरक्षा रक्षक मल्हारी शिंदे या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरु आहे.

मागील वर्षी 2023 मध्ये 910 अग्निशामक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये 42 हजार 534 पैकी 18 हजार 481 उमेदवार पात्र ठरले होते. यातून 873 उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात आली. पहिल्या बॅचमध्ये 490 उमेदवारांनी प्रशिक्षण पुर्ण केले. दुसऱ्या बॅचमध्ये 247 उमेदवारांनी प्रशिक्षण पुर्ण केले. त्यानंतर 277 उमेदवारांची प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. या यादीची मुदत नोव्हेंबर 2023 मध्ये संपली. असे असतानाही मनीष पाटील, रुपेश पाटील, दतात्रय पवार, देवीदास वाघमारे आणि मल्हारी शिंदे यांनी बनावट पत्र तयार करुन त्यामध्ये ‘मैदानी चाचणी व सरळ सेवा भरती प्रणालीमध्ये, विविध चाचण्यांमध्ये गुणवत्तेनुसार आपली निवड झाली आहे’, असे उमेदवारांसाठी बनावट पत्र तयार केले. तसेच पत्र मिळाल्यानंतर 12 जुलैपर्यंत वैद्यकीय तपासणीसाठी हजर राहण्यास सांगितले. या पत्रावर प्रमुख अग्निशमन अधिकारी यांची स्वाक्षरी असल्याचे आढळले. तसेच जावक पत्राच्या क्रमांकातही तफावत दिसून आली. 

विशेष म्हणजे, मागील वर्षी अग्निशमन जवानांची झालेली भरती ही संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणेच्या निगराणीखाली झाली होती. अशा पद्धतीने भरती ही पहिल्यांदा अग्निशमन दलात झालेली होती. भरती प्रकियेत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी चांगलीच कामगिरी बजावली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here