मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅम मंदिर मुद्द्यावरून नाशिकच्या सभेत खडे बोल सुनावले असले तरी त्याचा भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीवर कसलाही परिणाम होणार नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली. तर शिवसेना सचिव आणि राज्य सभा सदस्य अनिल देसाई यांनीही युती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आज. दरम्यान, 230 ते 250 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या भाजपने युती टिकावी यासाठी ताठर भूमिका सोडून नमते घेतले असून मित्रपकक्ष असलेल्या शिवसेनेला 135 पर्यंत जागा सोडण्याची तयारी ठेवली आहे, असे भाजप सूत्रांनी सांगितले.
सेव्ह आरे, सेव्ह मुंबई असा नारा देत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेमधील मेट्रो कारशेडच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी नाणार प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याचे भाष्य करून शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले होते. तर मोदी यांनी राम मंदिर मुद्द्यावरून अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
भाजप सूत्रांच्या दाव्यानुसार भाजप-शिवसेनेचे ठरले आहे. कोणी काहीही निष्कर्ष काढो, युती होणार आणि जागा वाटप वरून फार ओढाताण होणार नाही. ‘घटक पक्षांना जागा काही जागा सोडून उर्वरित जागा प्रत्येकी पन्नास टक्के याप्रमाणे जागा वाटप होईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केले होते. परंतु, या एका मुद्द्यावरून युतीत मिठाचा खडा पडणार असेल तर शिवेसेनेला आणखी काही जागा वाढवून द्यायच्या, या निर्णयाप्रत भाजप नेतृत्व आले आहे,’ असे भाजप सूत्रांनी सांगितले.
या नेत्याने दावा केला की शिवसेनेला जास्तीत जास्त 135 जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे. 288 पैकी उर्वरित 153 जागा भाजप लढेल. भाजपला या 153 मध्ये छोट्या घटक पक्षाना स्वतःच्या कोट्यातून जागा सोडव्या लागणार आहेत. भाजप सूत्राने दावा केला आहे की युती करून लढल्यास 230 ते 250 जागेवर यश मिळू शकेल. असे झाल्यास लोकसभेप्रमाणे महाराष्ट्रातही विरोधी पक्ष नेतेपद रिक्त राहू शकेल.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन युती होणार आहे, कामाला लागा, असे निर्देश दिलेत. शिवसेना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप-सेना नेत्यांमध्ये जागा वाटपसंदर्भात चर्चा सुरू असून सन्माननीय जागा मिळाल्यास युती होईल.
जागा वाटप मुद्द्यावरून भाजप-सेना युती 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान युती तुटली होती. भाजप-सेना युती 1984 मध्ये अस्तित्वात आली होती. 1989 मध्ये एकदा युती तुटली होती. त्यावेळी भाजपला लोकसभा निवडणुकीत दोन जागा मिळाल्या होत्या.