●रिंगच्या खेळात सहभागी न होणाऱ्या विकासक, वास्तू विशारद यांच्या विरोधात दुष्प्रचार
●रिंगच्या सदस्यांना काम न देणाऱ्या गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव
●जुन्या ठाण्याचा पुनर्विकासावर पुन्हा अविश्वासाचे सावट
ठाणे: सरकारी निविदांत (tender) ठाण्यात (Thane) ‘रिंग’चा (Ring) वापर असल्याचा आरोप अधूनमधून होत असतो. निविदा ठराविक कंत्रादारांना (contractor) मिळाव्यात यासाठी होणाऱ्या रिंगवर उलटसुलट चर्चा होत असते. मात्र आता, राज्याची उप-सांस्कृतिक राजधानी असलेल्या ठाणे शहरातील पुनर्विकासाच्या पूर्णतः खाजगी आणि व्यावसायिक कामातही रिंग तंत्रांचा वापर होत असल्याची कुजबूज बांधकाम व्यवसायाच्या वर्तुळात आहे.
जुन्या ठाण्याचा पुनर्विकास (redevelopment) बहुचर्चित आहे. नवे ठाणे, विशेषतः घोडबंदर मार्गावरील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या सोयीसाठी जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासाला चालना दिली जात नाही; असा आरोप गेली काही वर्ष होत आहे. पुनर्विकासाचे नियम, रेरा नोंदणी (RERA), विमुद्रिकरण (demonetisation) यामुळे गेली काही वर्ष बांधकाम व्यवसायाची गती मंदावल्याचे सांगितले जात आहे. पुनर्विकासाला याचा काहीसा फटका बसल्याचे चित्र आहे.
अडथळ्यांची शर्यत पार करून पुनर्विकास मार्गी लागत आहे. ठाण्यात पुनर्विकासात विकासक (बिल्डर्स) (builders) म्हणून उच्चशिक्षित तरुणाई येत आहे. आपल्या शैक्षणिक कौशल्याच्या आणि ज्ञानाच्या आधारे नोकरी करता असताना जाणीवपूर्वक मध्यमवर्गीय तरुण बांधकाम व्यवसायिक म्हणून प्रवेश करत आहेत. या शिक्षित मध्यमवर्गीय तरुणाईमुळे पुनर्विकासात काहीसे आश्वासक चित्र निर्माण होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रिंग तंत्राच्या प्रवेशाने पुनर्विकासावर पुन्हा दुष्ट चक्रात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुनर्विकासाठी पुढे येणाऱ्या छोट्या अपार्टमेंट्स, गृहनिर्माण संस्था यांचे काम रिंग सदस्यांना मिळावे यासाठी फिल्डिंग लावली जात असल्याचे कळते.
पुनर्विकासाच्या निविदेची रचना रिंगच्या सोईसाठी तयार केली जाते. यासाठी वास्तू विशारदाला (architect) हाताशी धरले जाते, असे समजते. विशिष्ट विकासकाला काम मिळावे यासाठी उर्वरित रिंग सदस्य निविदा भरताना तांत्रिक चुका करतात. त्यामुळे त्यांच्या निविदा नियमानुसार बाद होतात. ज्याची निविदा मंजूर होते तो विकासक रिंग मधल्या सदस्यांची काळजी घेतो. रिंग प्रकाराचा वापर करून जुन्या ठाण्यात पुनर्विकासात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे.
हाती आलेल्या माहितीप्रमाणे, येथील पाचपाखाडी परिसरातील एका गृहनिर्माण (housing society) संस्थेच्या पुनर्विकासाच्या निविदेच्या अटीत डिमान्ड ड्राफ्ट असा उल्लेख असताना सोबत धनादेश जोडला गेल्याने निविदा अवैध ठरली. ज्याने डिमान्ड ड्राफ्ट जोडला होता त्याची निविदा वैध ठरली. अशा तांत्रिक चुका करून एकमेकांना आधार सहाय्य करण्यातून रिंगचे अस्तित्व जाणवत आहे.
पुनर्विकासाच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार ( पीएमसी ) म्हणून नियुक्त होणाऱ्या वास्तू विशारदाने विशिष्ट विकासक सुचवू नये असा संकेत आहे. मात्र, रिंग सदस्य विकासकाने गृहनिर्माण संस्थेला अमुकच नाव सुचवावे आणि अमुक नाव सुचवू नयेच असं आग्रह धरतात. यासाठी रिंग सदस्य आपली सामाजिक प्रतिष्ठा पणाला लावत असल्याची चर्चा आहे.
अधिक माहितीनुसार, रिंग सदस्याला पुनर्विकासाचे काम नाकारून स्वतंत्रपणे काम करणाऱ्या तरुण मध्यमवर्गीय विकासकाला काम दिल्यास रिंग सदस्य त्याच्या विरोधात अपप्रचार मोहीम चालवितात. संबंधित विकासकाची ऑफर चुकीची आहे. त्याचे अन्य गृहनिर्माण प्रकल्प अर्धवट पडले आहेत. भांडवली बाजारात त्याची फारशी पत नाही. अशा स्वरूपाच्या कंड्या पिकविल्या जातात. संबंधित गृहनिर्माण संस्थावर दबाव टाकला जातो. संबंधित विकासकाच्या विरोधात माहितीच्या अधिकाराखाली (RTI) अर्ज केले जातात. या प्रकारामुळे स्वतंत्रपणे काम करणारे उच्चशिक्षित मध्यमवर्गीय तरुण विकासक आणि वास्तू विशारद दडपणाखाली वावरत असल्याचे बोलले जात आहे.
पुनर्विकासाची गाडी वेग घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यावर अनिश्चिततेचे सावट पडत आहे. अपार्टमेंटस, गृहनिर्माण संस्था यात पुनर्निर्माणावरून दोन गट असतात. तरुणाई पुनर्विकासाठी पुढाकार घेत असताना बांधकाम व्यवसायातील अनिश्चिततेमुळे ज्येष्ठ नागरिक फारसे उत्सुक नाही अशी स्थिती असते. या पार्श्वभूमीवर रिंग प्रकाराने अस्वस्थता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविषयी विकासक आणि वास्तू विशारद यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तो सफल झाला नाही. याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.