@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिका शाळेतील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण मिळावे यासाठी ब्यूनास आयर्स व महापालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याबद्दल अर्जेंटिनाचे राजदूत हुगो गोबी यांनी स्वारस्य दाखविले आहे. (Argentina expresses willingness to teach football to students of BMC school)
अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत हुगो गोबी (Dr Hugo Gobbi) यांनी मंगळवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांची भायखळा येथील महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी, अर्जेंटिनाचे मुंबईतील वाणिज्य दूत गियरमो देवोतो, उप वाणिज्य दूत सिसिलिया रिसोलो, राजकीय विभागाचे प्रमुख रेनाटो मोरालेस, महापालिका उप आयुक्त (परिमंडळ -२) हर्षद काळे, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
माझी मुलगी परिचारिका (Nurse)असल्यामुळे मला परिचारिकांची सेवावृत्ती याची चांगली जाणीव आहे असे अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत हुगो गोबी म्हणाले. असे सांगून त्यांनी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुरुवातीला परिचारिका म्हणून केलेले काम आणि कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल महापौरांचे कौतुक केले.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी, कोविड काळात मुंबई महापालिकेने केलेले काम, महिला सक्षमीकरण तसेच स्टार्टअप (start up) उद्योगाला चालना देण्यासाठी पालिकेने परवानग्या मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न, सुसूत्रीकरण व पुरवलेल्या सेवासुविधा आदींबाबत माहिती दिली.
यावेळी, महापौर किशोरी पेडणेकर यांनी, हुगो गोबी व इतर मान्यवरांचे शाल, मुंबई महापालिकेची नागरी दैनंदिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित महापालिकेने तयार केलेले “कॉफीटेबल बुक” तसेच पुष्पकुंडी देऊन स्वागत केले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापौर निवासस्थानाच्या आवारात जायफळ तसेच शोभिवंत झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.