फुटबॉलवेड्या विपुल पटेलचा आगळावेगळा पराक्रम
Twitter: @maharashtracity
मुंबई: फिफा वर्ल्ड कपमध्ये दररोज विक्रम होत आहेत. कुणी त्या गोल्ड ट्रॉफीच्या मागे आहे तर कुणी गोल्डन बुट आणि गोल्डन बॉलच्या शर्यतीत. पण असाच एक चाहता गोल्डन फॅनच्या शर्यतीत “एव्हरेस्ट”वर पोहोचलाय. ज्या उंचीवर पोहोचणे कठीण असेल. असा हा वेडा इतिहास घडवतोय. कारण वेडीच माणसे इतिहास रचतात. हे तंतोतंत खरे ठरवलेय हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन फुटबॉलवेड्या विपुल पटेलने.
कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपचे (Qatar FIFA World Cup) गेल्या 15 दिवसांत नॉनस्टॉप 39 सामने पाहून विपुलने फुटबॉल चाहता म्हणून एक आगळा वेगळा विक्रमच केला आहे. उर्वरित 10 सामनेही तो नॉनस्टॉप पाहणार आहे. आजवर असा अशक्य पराक्रम कुणीही केला नव्हता आणि भविष्यातही कुणी करेल असे वाटत नाही. मात्र, आपल्या महाराष्ट्रातल्या (Maharashtra) ७० वर्षीय ओमप्रकाश मुंद्रा या खेळवेड्यानेही नॉनस्टॉप 37 सामने पाहिले आहेत. त्यांना केवळ उद्घाटनीय सामना पाहता आला नव्हता.
क्रिकेट (Cricket) असो किंवा फुटबॉलचा (Football) वर्ल्ड कप. वर्ल्डकपला येणारे परदेशी चाहते मुळात आपल्या देशालाच फॉलो करतात आणि आपल्या संघाचे सामने नसतील तेव्हा मनमुराद पर्यटन करतात. पण विपुल पटेलचे कतारमधल्या वर्ल्डकपबाबत वेगळे प्लॅनिंग होते. मूळचा सूरतचा (Surat) असलेल्या विपुल पटेलने कतारमध्ये वर्ल्डकपमध्ये नॉनस्टॉप सामने पाहायचे, असे वर्षभरापूर्वीच ठरवले होते. त्यादृष्टीने त्याने फिफाची ऑनलाइन तिकीट विक्री सुरू होताच आपली तयारीही सुरू केली. त्याने ऑनलाइन पद्धतीने सर्व सामन्यांची तिकीटे मिळावीत म्हणून प्रयत्न केले आणि त्याने बहुतांश तिकीटे मिळवली देखील. कुणाचाही विश्वास बसणार नाही, पण विपुलने सर्वच्या सर्व 64 सामन्यांची तिकीटे अथक प्रयत्नांनी मिळविली होती.
ऑस्ट्रेलियातल्या (Australia) टी- 20 क्रिकेट वर्ल्डकपचा (T-20 Cricket World Cup) थरार महिनाभर अनुभवल्यानंतर तो थेट कतारमध्ये दाखल झाला आणि दोह्याला पोहचताच त्याने सर्वच्या सर्व आठ स्टेडियमचा प्रवास कसा करायचा हे प्रत्यक्ष प्रायव्हेट टॅक्सीतून पाहिले. अल बायत स्टेडियमवरचा उद्घाटन सोहळा पाहिल्यानंतर त्याने स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी चारही सामने पाहण्याचा जीवापाड प्रयत्न केले, पण त्याला ते शक्य झाले नाही. पहिल्या दिवशी त्याला तीनच सामने पाहता आले.
एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या स्टेडियमवर सामने पाहणारा विपुल हा एकटाच फुटबॉलवेडा असावा. त्याने चारही सामने पाहण्याचे प्लॅनिंग केले असले तरी प्रत्यक्षात एका स्टेडियमवरून दुसऱ्या स्टेडियमवर पोहोचणे आणि स्टेडियमच्या आत जाण्यासाठी लागणारा वेळ पाहता ते कठिण होऊ लागले. त्यामुळे त्याला प्रत्येक दिवशी चारही सामने पाहाता आले नाही. मात्र, त्याने कधी दोन तर कधी तीन सामन्यांचा वेगवान आणि नॉनस्टॉप अनुभव घेतला आणि अखेर 28 नोव्हेंबरला साखळीतले चारही सामने पाहण्याची आपली इच्छाही पूर्ण करीत साखळी सामन्यांच्या 14 दिवसांत 48 पैकी 33 सामने पाहण्याचा अभूतपूर्व विक्रम केला.
साखळीतील 33 सामने पाहिल्यानंतर तो बाद फेरीतील सर्वच्या सर्व 16 सामने पाहणार आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या तीन दिवसांतील सहाही सामने पाहण्याचाही पराक्रम केला आहे.
देवाचे मनापासून आभार
साखळीत चार सामने पाहताना माझी दमछाक होणार याची कल्पना स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी आली. त्यामुळे मी दिवसाला जास्तीत जास्त सामने कसे पाहू शकतो याचे प्लॅनिंग करताना दोन ते तीन सामने निश्चित केले आणि 28 नोव्हेंबरला मी जोरदार प्लॅनिंग करीत चारही सामने पाहण्याची माझी इच्छा पूर्ण केली. माझ्या या भन्नाट प्रवासासाठी मी देवाचे मनापासून आभार मानेन. त्यांनी मला आतापर्यंत फिट ठेवले आहे आणि उर्वरित दोन आठवडेही त्याने मला असेच ठेवावे, हिच मी देवाकडे प्रार्थना करीन.
विपुल फुटबॉलवेडा नव्हे खेळवेडा
विपुल फक्त फुटबॉलवेडा नाही. खेळाच्या निमित्ताने गेली 15 वर्षे तो जग फिरतोय. त्याने गेले तीन फिफा वर्ल्डकप प्रेक्षक म्हणून कव्हर केले. त्याने फुटबॉलच्या निमित्ताने पूर्ण ब्राझील आणि रशियाचे भ्रमण केले होते. गेल्यावेळी रशियात त्याने 24 दिवसांत चक्क 21 सामने मैदानात जाऊन पाहिले होते. हा सुद्धा एक अशक्य विक्रम होता. एवढेच नव्हे तर त्याने टी-20 चे आठही वर्ल्डकप पाहिले आहेत आणि गेले चार एकदिवसीय वर्ल्ड कपही त्याने दोन-दोन महिने थांबून पाहिलेत.
ओमप्रकाश मुंद्राही नॉनस्टॉप
ओमप्रकाश नावाची व्यक्तिही खेळवेडी आहे. गेली चार दशके हा 70 वर्षीय तरूण खेळ पाहण्यासाठी जग भ्रमंती करतोय. 1999 पासून त्यांनी क्रिकेटचे सर्व वर्ल्ड कप पाहिले आहेत तर टी-20 चेही सर्व वर्ल्ड कप त्यांनी न चुकता पाहिलेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकपासून (Sydney Olympic) त्यांनी सर्व ऑलिम्पक स्पर्धाही याची देही, याची डोळा पहिल्या आहेत.
तसेच 2006 च्या जर्मनी फिफा वर्ल्ड (Germany FIFA World Cup) कपपासून सुरू झालेला फुटबॉलचा प्रवास कतारपर्यंत नॉनस्टॉप आहे. यावेळी तर त्यांनी त्यांच्या सत्तरीला मागे टाकत आतापर्यंत 37 सामने पाहिलेत. केवळ त्यांना उद्घाटन सोहळ्याची तिकीट मिळू शकली नाही.