@vivekbhavsar
मुंबई: महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसापासून माध्यमांमध्ये आणि अर्थातच राज्यात फक्त एकाच नावाची चर्चा आहे आणि ती आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची (Union minister Narayan Rane). याच काळात दुसरे नाव प्रकर्षाने चर्चेला आले आणि ते होते युवा सेनेचे वरूण सरदेसाई (Varun Sardesai).
ज्यांच्या शिवाय शिवसेनेचे (Shiv Sena) पानही हलत नाही असे म्हटले जाते आणि जे प्रत्येक ठिकाणी आघाडीवर असतात, असे सेनेचे शक्तिशाली मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena Minister Eknath Shinde) यांचे प्राबल्य आणि महत्त्व युवा सेनेने (Yuva Sena) कमी केले की काय अशीच आता परिस्थिती आहे.
राणेंच्या वादग्रस्त विधानावरून भाजप-शिवसेनेत जो राडा झाला त्यामध्ये एकनाथ शिंदे कुठेही दिसले नाहीत. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना जाणीवपूर्वक या सगळ्या घडामोडी पासून दूर ठेवले असावे, असे म्हणण्यास वाव आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज आहेत आणि ते भाजपात (BJP) आले तर आम्ही त्याचे स्वागतच करू असे मोठे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. राणे यांच्यापाठोपाठ भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी देखील असेच वक्तव्य करून शिंदे यांच्याविषयी ‘मातोश्री’च्या (Matoshree) मनात आधीच असलेला संशय आणखी कसा वाढेल यास हातभार लावला होता.
राज्याचे नगर विकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना यावर तातडीने खुलासा करावा लागला. परंतु, जो खुलासा केवळ दोन वाक्यात संपणे शक्य होते आणि त्यावर पडदा पडू शकला असता, असा खुलासा करताना शिंदे यांनी प्रदीर्घ वक्तव्य केले. म्हणजेच कुठेतरी पाणी मुरते आहे, अशी शंका घेण्यास वाव राहतो, अशी प्रतिक्रिया शिंदे विरोधक गटातील एका आमदाराने व्यक्त केली.
एकनाथ शिंदे यांच्या विषयी नेहमीच वावड्या उठवल्या गेल्या. यातून शिंदे आणि ‘मातोश्री’ यांच्यातला दुरावा कसा वाढेल, असाच प्रयत्न शिंदे यांचे अंतर्गत विरोधक आणि अन्य पक्षातील नेत्यांनी केला आहे. शिंदे यांच्याकडे २२ आमदार आहेत आणि ते कधीही बाहेर पडू शकतात, अशी कुजबूज जाणीवपूर्वक पेरली जाते.
मंत्री शिंदे यांचे कोकणातील एक खंदे समर्थक असे म्हणाले की, वास्तविक २०१९ मधील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली (Sangli) येथील अतिवृष्टी असो किंवा कोकणातील (Konkan) वादळ आणि महापूर. याही पलीकडे जाऊन केरळमधला (Kerala) महापूर असो, या प्रत्येक ठिकाणी शिंदे पिता-पुत्र धावून गेले आहेत.
असे असूनही शिंदे हे ‘मातोश्री’शी प्रामाणिक नाहीत अशी चर्चा केली जाते. त्यातून शिंदे यांच्या विषयी संशयाचे ढग अधिक घडत होत गेले. शिंदे हे माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खास मर्जीतील आहेत, अशीही चर्चा जाणीवपूर्वक पेरली गेली. त्यामुळे शिंदे आणि ‘मातोश्री’ यांच्यामध्ये एक अदृश्य दुरावा निर्माण झाला आहे, असे कोकणातील हे आमदार म्हणाले.
जाता जाता त्यांनी हे ही कबूल केले की साहेब ज्या दिवशी सांगतील आणि जसा आदेश देतील, तसा निर्णय आम्ही घेऊ.
कदाचित हेच कारण असावे की राणे यांच्या वक्तव्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जी काही धुमशान झाली, जे आंदोलन पेटले, त्यामध्ये युवा सेनेला आणि खासकरून वरूण सरदेसाई यांना पुढे केले गेले आणि या सगळ्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले असावे, अशी शक्यता आहे.
शिवसेना – भाजप कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी जे काही घडले, त्यात एकनाथ शिंदे यांचे समर्थक किंवा स्वतः शिंदे कुठे दिसले नाहीत. शिवसेनेच्या आमदारांना जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले असावे अशी एक शक्यता आहे. यात केवळ युवासेना आणि आणि पडद्यामागून अनिल परब (Anil Parab) हे दोनच मोहरे समोर दिसत होते.
‘मातोश्री’च्या विश्वासातील असल्याचे दावा करणारे प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे देखील या सर्व घडामोडीपासून दूर होते. प्रताप सरनाईक हे व्यावसायिक आहेत. सक्त वसुली संचालनालयकडून (ED) होत असलेल्या चौकशीला कंटाळले आहेत. नव्याने चौकशी अगांशी येऊ नये, यासाठी या घडामोडीत त्यांनी सहभाग नोंदवला नसावा.
ठाण्यातील शिवसेनेचे तिसरे नेते आणि खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) यांचा सन २००३ मध्ये वडखळ जवळ मोठा अपघात झाला होता. त्यावेळी कुठलाही शिवसैनिक (Shiv Sainik) त्यांच्या मदतीला धावून आला नव्हता, असे म्हटले जाते. नारायण राणे यांनीच त्यावेळी राजन विचारे यांची काळजी घेतली होती. राणे यांच्यामुळेच विचारे या जीवघेण्या अपघातातून सावरले होते. साहजिक आहे, विचारे कधी राणे यांच्या विरोधात अशा पद्धतीने आक्रमक होणार नाहीत.
दरम्यान, युवा सेना – भाजपमधील या ठिणगीचा राजकीय लाभ कोणाला होईल हे पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत दिसून येईल. पण, या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्याशिवाय देखील शिवसेना ‘करून दाखवू’ शकते, हे ‘मातोश्री’ने सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे विरोधी गटातुन व्यक्त केली जात आहे.