नागपूर
बेरोजगारी आणि कंत्राटी भरती यांसारख्या विषयांवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज नागपूरात युवक मोर्चा काढण्यात आला होता.
राज्यातील विविध विभागातील 25 लाख पदं अद्याप रिकामी आहेत. पोलीस विभागात मोठी पदं रिकामी असताना ऑनलाईनच्या नावाने तरुणांची लूट केली जात आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं. सर्व जागा तातडीने भराव्यात अशी मागणी पटोलेंकडून करण्यात आली आहे.
नोकरीची पदे न भरता केवळ आश्वासनं दिली जात आहे. लोकसेवा आयोगाची अनेक पदं अद्याप रिकामी असून आता जानेवारीपर्यंतची चालढकल करण्यात आली असून तरुणांची वर्ष वाया घालवली जात आहे, असा घणाघात यावेळी नाना पटोलेंनी केला.
रस्त्यावर ठिय्या आंदोलन पुकारलेल्या नाना पटोलेंसह कार्यकर्त्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला. आणि शेवटी नाना पटोले यांना पोलिसांनी उचलून बाजूला केला. या मोर्चानंतर पोलिसांनी नाना पटोलेंना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.