@maharashtracity
By Milind Mane
महाड: राज्यसभा निवडणुकीप्रमाणे एक विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीचे सर्व पाच उमेदवार विजय होतील, अशी रणनीती भाजपाने पुन्हा एकदा आखली असून महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेचे माजी नेते आशिष कुलकर्णी सज्ज झाल्याचे बोलले जात आहे.
राज्यसभेची जागा जिंकून भाजपाने महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला व त्यासाठी रणनीती तयार करण्याचे श्रेय आशिष कुलकर्णी यांना दिले जाते. आशिष कुलकर्णी एकेकाळी शिवसेनेत असताना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते. परंतु ते आता भाजपामध्ये आहेत.
शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून तिसरी जागा भाजपाला जिंकून देणारे व निवडणुकीची रणनीती तयार करणारे आशिष कुलकर्णी हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असून सध्या ते पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती.
सन 2003 मध्ये ते काँग्रेसमध्ये होते. काही वर्षांपूर्वी २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये कार्याध्यक्षपदी बढती दिली, त्यावेळी तत्कालीन शिवसेना नेते व आता भाजपामध्ये असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी आशिष कुलकर्णी यांचे घनिष्ठ संबंध होते. सन 2009 च्या निवडणुकीत सहा संसदीय मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेसने त्यांना दिली होती. तेव्हा त्यांनी या जागा काँग्रेस पक्षाला जिंकून दिल्या होत्या. गांधी घराण्याने कुलकर्णी यांची राजकीय चाणक्य नीतिची चाल बघून त्यांना काँग्रेसचे तत्कालीन राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यासोबत काम करण्यास दिल्लीस पाचारण केले होते. सन 2010 मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवार विजय सावंत यांना विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी राजकीय चाणक्य निती वापरली होती. त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये काँग्रेसला रामराम करून काही काळ स्वतंत्रपणे काम केले होते.
सन 2008 व 2010 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊन धक्कादायक निकाल लागले होते. 2008 मध्ये काँग्रेसकडे पुरेशी मते असतानाही सुधाकर गणगणे यांचा पराभव झाला होता. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मोठा धक्का बसला होता. सन 2010 मध्ये 83 आमदार असलेल्या काँग्रेसचे तीन उमेदवार निवडून येऊ शकत होते, पण तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली राजकीय ताकद वापरून व सत्तेच्या जोरावर चौथा उमेदवार उभा केला. विजयाकरिता 2619 पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता होती. काँग्रेसचे चौथे उमेदवार विजय सावंत यांना पहिल्या पसंतीची अवघी तेराशे मते मिळाली होती. काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या आधारे पुरेशी मते नसतानाही काँग्रेसचा चौथा उमेदवार निवडून आला.
त्या निवडणुकीत विद्यमान परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या शोभाताई फडणवीस यांचा अत्यंत चुरशीच्या लढाईत पराभव केला होता परब यांना 2415 तर शोभाताई यांना 2291 मते मिळाली होती. मनसे व छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर अशोक चव्हाण यांनी पाच मते अतिरिक्त असताना चौथी जागा निवडून आणली होती.
राज्यसभेचे प्रमाणे विधानपरिषद निवडणुकीत अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही तरी 285 मतदार या निवडणुकीत मतदान करतील. त्याआधारे 25.91 म्हणजे 26 मतांचा कोटा असेल. ५५ आमदार असलेल्या शिवसेनेचे दोन उमेदवार, 53 आमदार असलेल्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून येतील तर 44 आमदार असलेल्या काँग्रेसची दुसरी जागा निवडून येण्याकरिता 11 मतांची आवश्यकता असेल.
विधान परिषद निवडणूकीत भाजपचा पाचवा उमेदवार प्रसाद लाड व काँग्रेसचे दुसरा उमेदवार भाई जगताप यांच्यात लढत होईल. पाचवी जागा निवडून आणण्यासाठी भाजपला एकूण 128 ते 130 मतदारांचे पाठबळ लागेल. राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 आमदारांचे पाठबळ मिळाले होते. विधान परिषदेत गुप्त मतदान असते. ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला सव्वीस मतांची गरज लागेल. चाणक्य कोण हे वीस तारखेच्या निकालानंतर कळेल.
निव्वळ गणित चांगले असून चालत नाही तर राज्यशास्त्राचा अभ्यास असावा लागतो. राज्यसभेने जर शंभर टक्के करमणूक केली असेल तर विधान परिषद तीनशे टक्के करमणूक करणार असल्याचे राजकीय निरीक्षक बोलत आहेत. एकंदरीत काय तर राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूकीसाठी भाजपने पुन्हा एकदा आशिष कुलकर्णी यांची राजकीय चाणक्य नीति वापरण्याचे ठरवले आहे.