By Milind Mane
Twitter: @manemilind70
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागताच मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होईल, अशी आशा शिंदे – फडणवीस सरकारमधील
दोन्ही गटांतील आमदारांना होती. तसे दावेही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी तसेच शिंदे गटाचे प्रतोद यांच्याकडून वारंवार केले जात होते. पण खांदेपालटात समाधानकारक काम न केलेल्या शिंदेसेनेच्या पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देऊन त्या जागी नवीन मंत्री नेमा, असे आदेश भाजपच्या हायकमांडने दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी अडचण झाली आहे.
शिवसेनेच्या बंडामध्ये साथ देणाऱ्यांना हटवायचे कसे? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर उभा राहिला आहे. तसेच शिंदे गटातील सर्व मंत्र्यांच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी भाजपची स्वतंत्र यंत्रणा आहे. लोकसभा- विधानसभा निवडणुकीत या मंत्र्यांचा कितपत उपयोग होईल? याचा अहवाल यंत्रणेने हायकमांडला दिला आहे. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक व मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या मंत्र्यांना हटवण्याचा मोठा पेच प्रसंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर उभा राहिला आहे
हे मंत्री आहेत काळ्या यादीत
शिवसेनेत बंड करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील व बंडात साथ देणाऱ्या या मंत्र्यांना काढावे कसे हे मुख्यमंत्र्यांसमोर मोठे व अडचणीचे धर्मसंकट आहे. जे मंत्री काळ्या यादीत आहेत, त्यांचा इतिहास पुढील प्रमाणे
१. गुलाबराव पाटील: अपेक्षित कामे नाहीत
ग्रामीण, शहरी भागातील पाणीपुरवठ्याची कामे अपेक्षेनुसार झाली नाहीत. त्यामुळे ग्रामीण मतदारांत सरकारविषयी नाराजी.
शिंदेंना का हवे?- उद्धव सेनेकडून होणाऱ्या हल्ल्यांना आक्रमक उत्तर देणारे आणि उत्तर महाराष्ट्रात ताकदवान.
२. तानाजी सावंत: प्रत्येक जिल्ह्यात स्वत:चे ‘खासगी सचिव’ नेमले.
सार्वजनिक आरोग्य सुधारणेत कोणतीही महत्त्वाची कामगिरी बजावली नाही. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात स्वत:चे ‘खासगी सचिव’ ही नेमले आहेत.
शिंदेंना का हवे?- पश्चिम महाराष्ट्रात मोठे प्रस्थ, ठाकरेंना तीव्र विरोध
३. संजय राठोड: औषध विक्रेत्यांच्या तक्रारी.
भाजप समर्थक असलेल्या औषधे विक्रेत्यांच्या तक्रारी. तसेच एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणाने समाजात प्रतिमा मलिन.
शिंदेंना का हवे?- विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या बंजारा समाजाची मते मिळवण्यात उपयोगी ठरतील.
४. अब्दुल सत्तार: कृषी योजनांचा लाभ नाही.
केंद्राच्या योजनांचा लाभ कृषिमंत्री सत्तार खालपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी नाराज आहेत.
शिंदेंना का हवे? – एकमेव मुस्लिम मंत्री. वेळोवेळी अनेक ‘अर्था’ ने मदत करतात आणि स्वबळावर विजयाची क्षमता.
५. संदिपान भुमरे: बदल्यांमध्ये गुंतले.
रोहयो, फलोत्पादन योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या नाहीत. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेपाचा आरोप.
शिंदेंना का हवे?– बंडासाठी सर्वात अग्रेसर. बंडखोरांना एकत्र करण्यात महत्त्वाची भूमिका होती आणि मराठा चेहरा.
भाजपवर रुसले एकनाथ शिंदे
राज्य मंत्रिमंडळाचा लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार, अधिकारी बदल्या, शिवसेनेच्या मतदारसंघांत भाजपचा हस्तक्षेप, कल्याणमध्ये पुत्र श्रीकांत शिंदेंना भाजपमधून होत असलेला तीव्र विरोध या कारणांमुळे मुख्यमंत्री शिंदे भाजपवर नाराज आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर दिल्लीतील भाजपा पक्षश्रेष्ठींनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हवा असल्यास मंत्रिमंडळात सध्या कार्यरत असलेले पाच मंत्र्यांना नारळ द्या आणि मगच पुढील मंत्रिमंडळ विस्तार करा, अशा सूचना दिल्या असल्याने मागील पाच दिवसापासून मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांसहित आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
त्यातच कोल्हापूरसह अमळनेर, कागल, धुळे व अन्य शहरातील येथील जातीय दंगल, मुंबई येथील सावित्रीबाई फुले हॉस्टेलमधील मुलीचा दुर्दैवी मृत्यू, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याच्या देण्यात आलेल्या धमक्या तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत तसेच त्यांचे बंधू व आमदार सुनील राऊत यांना देण्यात आलेल्या धमक्या, या सर्व पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे जाण्याची शक्यता अधिक असल्याने शिंदे गटातील मंत्र्यांसहित आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.