नगर विकास मंत्रालयात ‘आशर’ चा बोलबाला
मुंबई: शिवसेनेतील (Shiv Sena) सर्वाधिक कार्यक्षम आणि कोणत्याही अडचणीत धावून जाणारे मंत्री (Minister) अशी ओळख असलेले नगर विकास (UDD) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी कारणीभूत ठरू शकतील त्यांचे ‘लाडके’ ‘आशर’. कोण आहेत हे आशर असा प्रश्न सामान्य वाचकाला पडू शकेल, मात्र, ठाण्यात (Thane) आणि खासकरून बांधकाम (Construction) क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना (Builders) ही व्यक्ती चांगलीच परिचित असल्याचे म्हटले जाते.
महाविकास आघाडी (MVA) सरकार सत्तेवर आल्यापासून मंत्रालयात अशा ‘बाह्य शक्तींचा’ वावर वाढला असल्याचे सांगितले जाते. त्यात महिला व बालकल्याण (Women and Child Development), गृहनिर्माण (Housing), उद्योग (Industries) या विभागांचा समावेश आहेच. त्यात आता नगर विकास विभागाचा समावेश झाला आहे.
बांधकाम व्यावसायिकांमध्ये या ‘आशर’ यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असल्याचे एका व्यावसायिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत बोलतांना तो म्हणाला की, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे अत्यंत कार्यक्षम असले तरी या ‘आशर’ ने या मंत्रालयावर (Mantralaya) थेट कब्जा केला आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
या सूत्राने पुढे सांगितले की, या ‘आशर’ चा वावर केवळ मंत्र्यांच्या कार्यालयातच आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) येथे असतो असे नाही तर मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीलाही ‘आशर’ थेट उपस्थित असतात. कोणत्या अधिकाराने ही व्यक्ती सरकारी बैठकीला उपस्थित राहते? त्यांना मंत्री महोदय यांनी काही विशेष अधिकार दिले आहेत का? असे प्रश्न उपस्थित करून या सूत्राने दावा केला की, मंत्री घेत असलेल्या निर्णयांमध्ये ‘आशर’ यांचा प्रभाव असतो आणि त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो.
“मंत्री शिंदे यांना नगर विकास विभागाची नियमावली समजत नसेल तर त्यांनी नगर विकास विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्याला विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून नियुक्त करावे, पण एखाद्या खाजगी व्यक्तीला थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये,” अशी अपेक्षा या सूत्राने व्यक्त केली.
मंत्री गोपनीयतेची शपथ घेत असतात. सरकारी कामकाजात काही बाबी गोपीनिय राहणे हे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक असते. असे असतांना ‘आशर’ सारखा एक खाजगी व्यक्ती थेट सरकारी बैठकीला उपस्थित राहतो, निर्णय स्वतः घेतो किंवा मंत्री शिंदे यांच्या निर्णय प्रक्रियेवर थेट प्रभाव राखतो. असे होत असेल तर ते शासनासाठी धोक्याची घंटा असेल, असा दावा या सूत्राने व्यक्त केला.
दरम्यान, एम एम आर डी ए च्या एका बैठकीत उपस्थित असलेल्या आशर बद्दल एका सनदी अधिकाऱ्याने (bureaucrat) जाहीर नापसंती व्यक्त केली आणि मंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्राने सांगितले. परंतु, मंत्र्यांनी या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने समस्त सनदी अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.
आशर यांचा मोर्चा आता मुंबई महापालिकेकडे (BMC) वळला असून मुंबई मनपाच्या प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप वाढला असल्याचे सूत्राने सांगितले.