@maharashtracity
कोस्टल रोड कामांत ६५० कोटींचा घोटाळा -: भाजपचा आरोप
आरोपांबाबत भाजप नेते, नगरसेवकांत दुमत, आरोप निराधार; नेमका किती कोटींचा घोटाळा ?-: शिवसेना
मुंबई: मुंबईसाठी व शिवसेनेसाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘कोस्टल रोड’ च्या कामातील भ्रष्टाचाराच्या (scam in Coastal road project) आरोपावरून बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेना व भाजप यांच्यात सभागृहात व बाहेर तू तू मैं मैं झाल्याचे निदर्शनास आले.
मुंबई महापालिका निवडणूक (BMC election) जसजशी जवळ येऊ लागलीय तसतसे सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) व पहारेकरी भाजप (BJP) यांच्यातील आरोप – प्रत्यारोप, शाब्दिक चकमकी, हातघाईपणा, राडा, संघर्ष यांत वाढ होऊ लागली आहे.
दिनांक ३ डिसेंबर रोजी वरळी येथील गॅस दुर्घटनेवरून (Worli incident) पालिका सभेत सेना – भाजपात राडा झाला. या राडेबाजीने टोक गाठले असून प्रकरण पोलिसात व महिला आयोगाकडे गेले आहे. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत कोस्टल रोड प्रकल्पातील कथित घोटाळ्यावरून भाजप नगरसेवक आक्रमक झाले व त्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.
बैठकीनंतर जोरदार घोषणाबाजी करीत गदारोळ घातला. त्यावेळी पालिका सभागृहात शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल (Rajul Patel) यांनी, भाजपवर टीका करीत तोंडसुख घेतले. याप्रसंगी भाजपच्या ज्योती आळवणी (Jyoti Alavani), राजेश्री शिरवाडकर (Rajeshree Shirwadkar) आणि सेनेच्या राजूल पटेल यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
कोस्टल रोडच्या कामाच्या अंतर्गत सल्लागाराला ७ कोटी रुपयांची शुल्कवाढ कंत्राटदारामार्फत देण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीला आला होता. त्यावेळी भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat) यांनी, प्रस्तावाला विरोध दर्शविला. कोस्टल रोडच्या कामांत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगने (CAG) ठेवला आहे.
या कामाच्या अंतर्गत सल्लागाराला (Consultant) २१५ कोटी रुपये आणि कंत्राटदाराला (Contractor) कोणतेही काम न करता १४२ कोटी रूपये बेकायदेशीरपणे दिले असून एकूण ६५० कोटींचा संशयास्पद गैरव्यवहार झाल्याचा आरोप कॅगने केला आहे. पालिकेने याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.
सल्लागार, कंत्राटदार व पालिकेतील भ्रष्ट अधिकारी मिळून पालिकेची लूट करीत आहेत, असे आरोप करीत भालचंद्र शिरसाट यांनी उपसुचनेद्वारे प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची जोरदार मागणी केली.
मात्र, त्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी, उपसूचना व प्रस्ताव मतदानाला टाकल्यावर भाजप नगरसेवक एकाकी पडले व सत्ताधारी शिवसेनेने विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सदस्यांच्या सहकार्याने प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला.
त्यानंतर, भाजप सदस्यांनी बैठक संपल्यावर सभागृहातून बाहेर पडून व भाजप पक्ष कार्यालयापर्यंत शिवसेना व स्थायी समिती अध्यक्ष यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.
भाजप नेते, नगरसेवकांत दुमत -: यशवंत जाधवांकडून खिल्ली
“भाजपचे एक बेशिस्त नेते (आशिष शेलार) कोस्टल रोडच्या कामांत कधी १ हजार कोटी तर कधी १,६०० कोटींचा घोटाळा झाल्याचे आरोप करतात. तर इकडे पालिकेत भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट हे कोस्टल रोडच्या कामांत एकूण ६५० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करतात. मात्र सभागृहाच्या बाहेर मिडियासमोर ८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करतात.”
“त्यामुळे अगोदर भाजपचे आरोप करणारे नेते, नगरसेवक यांनी एकत्र बसून बैठक घ्यावी, नेमका किती कोटींचा घोटाळा ते मोजावे आणि एकदा ठरवावे की नेमका किती कोटींचा घोटाळा झाला आहे ? मगच त्याबाबत आरोप करावेत.”
“भाजपच्या नेत्यांनी व नगरसेवकांनी नुसते हवेत, निराधार आरोप करू नये. वास्तविक, कोस्टल रोडचे काम नीटपणे सुरू असून त्यात कोणताही घोटाळा झालेला नाही. पालिकेने स्वतः त्याचे स्पष्टीकरण कालच दिले आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना एक चांगली सुविधा मिळणार आहे.”
- यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती