By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या शेतपिकांच्या हानीची भरपाई शासनाने घोषित करावी, या मागणीवरून आज विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीचे पंचनामे झाल्यावर त्वरित साहाय्य घोषित करु असे जाहीर केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही चर्चा व्हावी असे सुचित केले. समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

सभागृहात कामकाज प्रारंभ होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या हानीविषयी चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावावर बोलण्याची अनुमती मागितली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य छगन भुजबळ आणि काँग्रेसचे सदस्य नाना पटोले यांनीही बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी केली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी
विरोधकांची शेतकर्‍यांविषयीची कणव म्हणजे ‘मगरीचे अश्रू’ अशी टोलेबाजी करीत याप्रश्नी राजकारण करत आहेत, असा आरोप केला. महाविकास आघाडी काळातील अनुदानाचे पैसे आम्ही शेतकर्‍यांना दिले. आतापर्यंत आम्ही सात हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. नाफेडद्वारा कांदा खरेदी चालू आहे. त्याची आकडेवारीही दिली आहे, असे सांगून फडणवीस पुढे म्हणाले, सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी राहिल. अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना साहाय्य करेल. हानीवरील साहाय्यासाठी प्रस्ताव तात्काळ मागवण्यात आले आहेत. विरोधकांचा सभात्याग हेही केवळ राजकारण आहे, अशी संभावनाही फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here