महिलांना आधार देण्याच काम नीलम ताई करतात: ठाकरे

@maharashtracity

मुंबई: निलमताई, काल परवा तुम्ही सभागृहाची उंची राखली. तुम्ही मंत्र्यांना खडसावून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. तो कोण होता म्हणून नाही तर आपण जिथे बसलो, ज्या पदावर बसलो. त्याला न्याय देताना आपण कुठे आलो आहोत याचं भान राहीले पाहिजे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री अणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांचे कौतुक केले.

विधिमंडळातील कामकाजादरम्यान नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना ज्या प्रकारे फटकारले, तो संदर्भ देत ठाकरे म्हणाले की, या सभागृहाचं पावित्र्य कसं राखलं पाहिजे हे तुम्ही दाखवून दिलं. उद्या कोणताही मुख्यमंत्री कसाही वागला तर त्यांची कानउघडणी केलीच पाहिजे. ते तुम्हाला करावे लागणार, असे सूचना करून ठाकरे यांनी सभागृहातील बेशिस्तीवर सडकून टीका केली.

शिवसेनेच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मातोश्री येथे करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार रविन्द्र वायकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, रवी म्हात्रे, उपसभापती कार्यालयाचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर, विशेष कार्यकारी अधिकारी सुप्रिया घोटाळे, पुणे शहरसंघटक राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, अश्विनी शिंदे, कौस्तुभ खांडेकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या (atrocities against women) घटना घडतात. आपल्या महाराष्ट्रात अशा घटना घडता कामा नये. महिला अत्याचारात कोणतीही जातपात पाहू नये. स्त्री म्हणूनच या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. त्यांना न्याय दिला पाहिजे. मग बिल्किस बानो असो की भंडाऱ्याचं प्रकरण किंवा निर्भया प्रकरण असो. सर्व पक्षांनी एकत्र येऊन महिला अत्याचाराविरुद्ध एकत्र यायला हवे.

ते म्हणाले, अशा प्रकरणात आपल्या कार्यकर्त्यावरही दयामाया दाखवू नये. तुमचं सरकार म्हणून आम्ही ओरडतो, आमचं सरकार म्हणून तुम्ही ओरडणार असा कोडगेपणा असू नये. सर्वांनी एकत्र येऊन महिला अत्याचारावर काम केलं पाहिजे.

नीलम गोऱ्हे यांच्या कार्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील अनेक भागात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्यावर, तिथे जाऊन कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना आधार देण्याच काम नीलम ताई यांनी आजपर्यंत केले आहे. मी नीलम ताईंना सांगण्या अगोदर, “साहेब मी घटनेच्या ठिकाणी आहे” असे उत्तर नीलम ताई यांच्याकडून मिळते. हे आजवर मी अनेकदा पाहिले असून एखाद्या महिलेमध्ये क्वचित अशी वृत्ती पाहण्यास मिळते, अशा शब्दात त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या आजवरच्या कार्याचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here