उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगावर आखपाखड

Twitter : @maharashtracity

मुंबई: निवडणूक आयोगाला सेना पदाधिकाऱ्यांची शपथ पत्र, पक्षाच्या सदस्यत्वाची माहिती दिली असताना देखील असा निर्णय द्यावयाचा होता, तर निवडणूक आयोगाने आज खाल्लेल शेण आधीच खायचे होते, अशी ठाकरी शैलीतील टिका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज निवडणूक आयोगावर  केली. 

निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निकालानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेना (Shiv Sena) कोणाची तसेच धनुष्यबाण (Bow and arrow) चिन्ह कोणत्या गटाला राहणार ही लढाई सहा महिन्यापासून सुरु आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme court) निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, असे यापूर्वीच सांगण्यात आले होते. तरीदेखील घाईघाईने देण्यात आलेल्या हा निर्णय देशात बेंबदशाही सुरु असल्याचे प्रतीक आहे, अशा शब्दात खरमरीत टिकाही ठाकरे यांनी केली. 

धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांची शिवसेना (Balasahenchi Shiv Sena) या पक्षाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आयोगावर अक्षरशः आगपाखड केली.

  

दरम्यान, निवडणूक आयोगाचा (ECI) निर्णय हा अनपेक्षित असल्याचे सांगत देशातील लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचे ठाकरे म्हणाले. देशाच्या स्वातत्र्यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात देशात बेबंदशाही सुरु असल्याची घोषणाच पंतप्रधानांनी करावी, असे खोचक आवाहनही ठाकरे यांनी पंतप्रधानांना केले. संपूर्ण निवडणूक यंत्रणाच दाबावाखाली काम करत असून निवडणूक आयोग हे थोतांड झाले आहे. त्यामुळे लोकशाहीला आदरांजली वाहण्याचा काळ सुरु असल्याचे ठाकरेंनी म्हटले. 

निवडणूक आयोगाचा हा निर्णय पालिका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागण्यासाठी ठरवून देण्यात आला असल्याचे ठाकरे म्हणाले. सध्या भाजपाची दयनीय अवस्था झाली असल्यानेच सर्वबाजूंनी कोंडी करण्याचे कारस्थान असल्याची टिका भाजपाचे (BJP) नाव न घेता ठाकरे यांनी केली. ज्या पद्धतीने मिंधे गटाला चिन्ह व पक्ष आले त्यावरुन त्यांना मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC election) जिंकायची असल्याचे मत ठाकरे यांनी मांडले. यातून मुंबईच्या हातात कटोरा द्यावयाचे आहे. मात्र आता मशाल पेटलेली असून ती सुद्धा हिसकावून घेण्याची ते रणनिती आखू शकतात, अशी भीती ठाकरे यांनी व्यक्त केली.

बाळासांहेबांच्या धनुष्यबाणात शक्ती :

शिंदे गटाला देण्यात आलेले चिन्ह हे कागदावरचे धनुष्यबाण असून खरे धनुष्यबाण माझ्याकडे आहे असे सांगत ठाकरे यांनी बाळासाहेब (Balasaheb Thackeray) पुजा करत असलेल्या धनुष्यबाणाची प्रतिमा सर्वांना दाखवली. शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यातील शिवधनुष्याचे तेज शक्ती दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे ठाकरे म्हणाले. शंभर कौरव एकत्र आले तरी पांडवांचा विजय झाला. मात्र, आजचा निर्णय हा लोकशाहीवरील अत्याचार असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. 

हा महाराष्ट्र छत्रपतीचा असून तो अत्याचार खपवून घेणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आपण जाणार असून तिकडे तो गट अपात्र होईल याची खात्री ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच नारायण राणेंचे (Narayan Rane) नाव न घेता लघू उद्योग मंत्री ’धनुष्यबाण त्यांनाच द्या‘ असे दोन दिवसांपासून सांगत फिरत होते. म्हणजे हा निर्णय लागणार याची जाणीव त्यांना होती, असे ठाकरे म्हणाले.

धनुष्यबाण ओरबाडून दिले तरी ते कुठेही जाणार नाही. चोर तो चोर असतो. नामर्द किती जरी मातला तरी मर्द होऊ शकत नाही. चोरी केलेल्याना सध्या पेढे खाऊ द्या. हे बाजारबुणगे देशाला परवडणारे नाही, असेही ते म्हणाले.

निवडणूक आयोगाचा बनाव

ठाकरे म्हणाले, गेले काही दिवस निवडणूक आयोगाने थोतांड सुरु केले. आयोगाने जे जे मागितले ते ते देण्यात आले. मात्र आज शेण खाल्लेच. ते यापूर्वीच खायचे होते. आचारसंहिता सुरु असताना हा निर्णय करणे हे योग्य आहे का असा सवाल उपस्थित करुन ठाकरे म्हणाले, येत्या दोन- तीन महिन्यात पालिका निवडणूक लादण्याच्या प्रयत्नात आहे. निवडणूक आयोग गुलाम आहे. लोकशाही संपताना आपण गप राहून पाहणार आहोत का असा सवाल करत इंदिरा गांधींना (Indira Gandhi) देखील जनतेने विरोधात जाऊन झिडकारल्याचे उदाहरण उद्धव ठाकरे यांनी दिले. 

नेमके तसेच आता ही होणार असल्याचे भाकित त्यांनी केले. आपला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. या प्रकरणातील कांगोरे तपासून घ्यावेत, कारण संपूर्ण याकडे जगाचे लक्ष आहे. तिथेही निर्णय चुकीचा लागला तर एकछत्री अंमल सुरु असल्याची घोषणा करावी. माध्यमांच्या कार्यालयावर धाडी टाकून, विरोधी पक्षांची कोंडी करण्याचे काम सुरु आहे. मात्र लोकशाही टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी आज केले.

निवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयाने मी अजिबात खचून गेला नाही, असे सांगताना, शिवसैनिकांनो कुठेही खचू जाऊ नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले. विजय आपलाच आहे. आता मैदानात उतरलो असून आता माघार नाही. ही चोरी काही काळच पचली आहे. त्यांना नाव तसेच फोटो आणि धनुष्यबाण चोरावे लागत आहे. नामर्दांनो तुम्हाला चोरी पचणार नसून जनता बदला घेतल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा, उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here