By मिलिंद माने
Twitter: @milindmane70
मुंबई: शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरेल, परंतु कितीही संकटे आली तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज चिखली (बुलढाणा) येथे केले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावे अणि शेतकऱ्यांना हमीभाव नाही तर हक्काचा भाव मिळवून द्या, असे आदेश दिले.
शेतकरी मेळाव्याला (Farmers rally) मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की अनेक महिन्यानंतर – वर्षांनंतर आपल्या दर्शनाला आलो आहे. दसरा मेळाव्यानंतरच आई जिजाऊंच्या जन्मस्थानी आशीर्वाद घेऊन सुरुवात करायची, म्हणून बुलढाण्यात आलो. आज शहीद दिन, संविधान दिन. परंतु ते संविधान आज सुरक्षीत आहे का? काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकरांच्यासोबत होतो. आज देशाची लोकशाही वाचवायची ही सगळ्यांची भावना. तेच बोलले आमचे रेडे. आज नवस फेडायला गेले. परवा हात दाखवायला गेले होते. तुमच भविष्य तुम्हाला माहिती नाही आणि हे राज्य चालवणार. दिल्लीने म्हटले की उठायचे बस म्हटले की बसायचे, अशा शब्दात ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
ठाकरे म्हणाले, काही जुने चेहरे दिसत नाहीत. नितिन देशमुख चांगला शिवसैनिक. ते परत आले. आज सगळे काय झाडी काय डोंगर सगळे ओक्के. ते तिकडे आशीर्वाद घ्यायला गेले, मी जिजाऊंचे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. काही गेलेत, नितिन आहे, विनायक राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत. मी पुन्हा त्वेषाने उभा आहे.
भाजप वर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले, भाजप आज आयात पक्ष, भाकड पक्ष. यादी काढा मग समजेल किती आयात लोक आहेत. स्वतः चंद्रकांत पाटील बोलले. मनावर दगड ठेवला. आजही गद्दारांनी सांगावे आम्ही भाजपाच्या टिकिटावर लढणार नाही. बाळासाहेब हवेत, चिन्ह हवे मग तुमची मेहनत कुठे आहे?
भाजप आणि राज्यपाल यांच्यावर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले, छत्रपतींचा वारंवार अपमान करायचा. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवताहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगताहेत. पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक त्यासाठी उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करतील. मिंधे गप्प बसतील. विठोबाला पण कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेणार. मी मुख्यमंत्री असतांना राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाही. काळ्या टोपीने अनेकदा अपमान केला.
काल अमित शहा बोलले आम्ही धडा शिकवला. पण बाबरी पाडल्यावर शिवसेना उभी राहिली, अमरनाथ यात्रेवेळी शिवसेनाप्रमुख उभे राहिले. आमच्या दैवताचा “पुराने आदर्श” म्हणून उल्लेख करतात. सत्तारने सुप्रिया सुळेंचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर लाथ घालून हाकलला असता. महाराष्ट्राचा अपमान होतोय, देवतांचा अपमान होतोय तुम्ही सहन करता हे असले बाळासाहेबांचे विचार नाहीत, असे ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, ज्योतिषाला हात दाखवता, आज शहीद दिवस आहे अणि हे नवस फेडायला गेले. यांचेकडे शेतकऱ्यासाठी वेळ नाही.
पीकविमा मिळाला का तुम्हाला? असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे म्हणाले, नागपूर अधिवेशनात मी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली होती. आता खोके सरकार गादीवर आले आहे आणि पनवती सुरु झाली. कसला नवस फेडता आणि शेतकरी दुर्लक्षित. अन्नदाता शेतकरी विचारतो खायच काय? पंतप्रधान म्हणतात मी दोन तीन किलो शिव्या खातो. तुमच ठिक आहे शिव्या खाऊन जगता पण शेतकऱ्यांचे काय? मागे मोर्चा काढला वठणीवर आले विमावाले, आता पुन्हा आणावे लागेल, असा इशारा ठाकरे यांनी विमा कंपन्यांना दिला.
ते म्हणाले, शिवसेना जिवंत सळसळत रक्त. कितीही फोडा तुम्हाला शक्य होणार नाही. मी तुमच्या भरवशावर आहे. पण तुमच्या संकटात उभे राहण्यासाठी आलो आहे. आत्महत्या करायची नाही. लंडनहून तलावार आणून होणार नाही ती पेलणार का? ती ताकद शेतकरी मावळ्यात आहे.
ते म्हणाले, संजय राऊत सारखा मर्द तुरूंगात जाऊन आले तरी सोबत आहेत. हे सगळे गद्दार, तोतये. यांचे कर्तृत्व शून्य. एका व्हिडिओत मुख्यमंत्री शेतीत रमले. शेतातला दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री. चिखल तुडवत खरे जाणारे शेतकरी असतात. कधीतरी डीपी जळते. हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जातो. तुम्ही ज्योतिष्याकडे जाता, मग शेतकऱ्याने कुठे जायचे. तुमची सुबत्ता दाखवता मग शेतकरी उपाशी का राहतो, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
मी घरात बसूनही कामे केली त्याचे कौतुक झाले. कोरोना, शस्त्रक्रिया यामुळे बंधने होती. तुम्ही कुठे फिरता सुरत, गुवाहटी, गोवा. पोळ्याला बैलाला सजवलेल्या पन्नास खोके मिळाले. तुम्ही घेतलेले पन्नास खोके शेतकऱ्यांना दिले तर त्यांचे भले होईल.
या मिंधे सरकार कडून काही अपेक्षा नाही असे सांगून ठाकरे म्हणाले, आपण हिंदुत्वावरुन कुणाला फसवले नाही. काश्मीर मध्ये भाजप मेहबूबा सोबत गेले तेव्हा काय होते? मी काँग्रेस – राष्ट्रवादीला घेऊन धाराशिव आणि संभाजीनगर करुन दाखवले. आम्ही काही सोडलेले नाही, बोक्यांना खोक्यांची भूक म्हणून हे गद्दारी करुन गेले. काय कमी केले होत तुमच? या गोरगरिबांनी तुम्हाला निवडून गेले. आज तात्पुरती सत्ता आहे, पण देशात तुमच्या कपाळावर गद्दाराची ओळख कायमची लागली, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरेल. हात वर करुन सांगा कितीही संकटे आली तरी आत्महत्या करणार नाही. पदाधिकाऱ्यांना सांगतोय शेतकऱ्यांच्या साठी रस्त्यावर उतरा. केवळ हमीभाव नाही हक्काचा भाव हवा. गद्दारांना धडा शिकवायचा, महाराष्ट्राचा अपमान, महाराजांचा अपमान सहन करायचा नाही, असे ठाकरे म्हणाले.