@vivekbhavsar
मुंबई: सुमारे सव्वा लाख कोटींचा फॉक्सकॉन (Foxconn) हा सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरात ने पळवल्याने महाराष्ट्रातील शिंदे गट – भारतीय जनता पक्षाचे सरकार टीकेचे धनी ठरले आहे. विरोधात गेलेल्या जनमतला शांत करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पेट्रोकेमिकल रिफायनरी (Petrochemical Refinery) अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्पाला जीवदान देण्याचा आज प्रयत्न केला. साडे तीन लाख कोटींच्या या प्रकल्पाला विरोध करू नये, असे आवाहन सामंत यांनी केले.
कोकणातील नाणार (Nanar project) येथे प्रस्तावित असलेला तेल शुध्दीकरण प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे तत्कालीन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारला रद्द करावा लागला. तत्कालीन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी राजापूर येथे जाऊन नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, महाराष्ट्रात भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पद भूषवत असताना या राज्यातून फॉक्सकॉन हा मोठा प्रकल्प गुजरातने पळवल्याने शिंदे अणि महाराष्ट्र भाजप टीकेचे धनी ठरले आहे. विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसह समाज माध्यमावर शिंदे – फडणवीस सरकारला टीकेला सामोरे हवे लागत आहे.
जनमत विरोधात गेल्याने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन फॉक्सकॉनपेक्षा जास्त गुंतवणुकीचा प्रकल्प महाराष्ट्रात आणला जाईल, अशी ग्वाही दिले. असे सांगताना त्यांनी तेल शुध्दीकरण प्रकल्पाचा उल्लेख केला.
Also Read: गव्हाणेच्या सोयीसाठी आदिवासी विभागाचे सुगंधी दूध पुरवठ्याचे ११३ कोटींचे टेंडर?
सामंत म्हणाले, साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प राजापूर तालुक्यात आणला जाणार होता. त्याला आम्ही त्यावेळी विरोध केल्याने प्रकल्प रद्द करावा लागला. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र पाठवून नाणार ऐवजी बारसू येथे प्रकल्प उभारावा अशी विनंती केली होती.
सामंत पुढे म्हणाले की, आता त्या भागातील खासदार (विनायक राऊत) या प्रकल्पाला विरोध करत आहेत, तर त्यांचेच आमदार (राजन साळवी) प्रकल्प हवा अशी मागणी करत आहेत. साडे तीन लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याने सर्व पक्षांनी याबाबत विचार करावा, अशी अपेक्षा उदय सामंत यांनी व्यक्त केली.
राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे अणि देवेंद फडणवीस यांचे सरकार आल्यापासून मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे (Bullet Train) मुख्य स्थानक बांद्रा कुर्ला कॉप्लेक्स येथे होण्याबाबत असलेल्या अडचणी दूर झाल्या आहेत. या स्थानकासाठी जागा हस्तांतर करण्याचे आदेश एम एम आर डी ए ने (MMRDA) याधीच काढले आहेत.
तर मेट्रोची कारशेड आरे कॉलनी येथेच उभारण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला. आता नाणार प्रकल्प तिथेच किंवा अन्यत्र पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय झाल्यास सरकारचे अर्धे अधिक उद्दिष्ट पूर्ण होणार आहे.