@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी, मुंबईकरांनी गेल्या २५ वर्षांपासून जो विश्वास टाकून शिवसेनेला आशीर्वाद दिला आहे तो यापुढेही कायम ठेवावा, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे.
शिवसेना पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुंबई महापालिका मुख्यालयातील सत्ताधारी शिवसेनेच्या नवीन पक्ष कार्यालयाचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन व पालक मंत्री नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घघाटन शनिवारी उदघाटन करण्यात आले.
रेल्वे सेवेबाबत विचारपूर्वक निर्णय
लोकांचे जीव वाचवणे हे पहिले कर्तव्य!
गेल्या एक वर्षाहून जास्त काळ पालिका कोरोनाविरोधात लढत आहे. याबाबत नागरिकांचेही सहकार्य मिळाल्याने कोरोना आता आटोक्यातही आला आहे. मात्र मुंबईत अद्यापही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. दररोज ५०० हून जास्त रुग्ण आढळत आहेत. टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करावे लागतील. आरोग्य तज्ज्ञांनी तिसर्या लाटेचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याबाबतच विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. कारण लोकांचे जीव वाचवणे हे पहिले कर्तव्य आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही रस्ते, पुलांसह अत्यावश्यक सेवेतील बहुतांश कामे कोरोनाचे नियम पाळून सुरू ठेवण्यात आली आहेत. पालिकेने विविध उपाययोजना राबवून कोरोनावर ज्या प्रकारे नियंत्रण आणले आहे, त्याची दखल सुप्रीम कोर्टासह पंतप्रधानांनीही घेतली असून त्यांनी पालिका, महापौर, आयुक्तांचे कौतुक केले आहे. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येऊच नये, अशी भावना व्यक्त करताना मुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व ‘नॉन कोविड’ कामेही लवकरच सुरू होतील, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पालिकेतील शिवसेनेचे नवीन दालन हे अत्यंत सुसज्ज व चांगल्या पद्धतीने तयार केले आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आज आपल्याला हे दालन प्राप्त झाले आहे. कोविड काळात आपल्या सर्व नगरसेवकांनी चांगले काम केले असून यापुढेही हे काम आपल्याला असेच पुढे चालू ठेवायचे आहे.