@vivekbhavsar
मुंबई: काँग्रेसचे तरुण नेते राजीव सातव यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस (महाविकास आघाडी) विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होणार आहे. दिनांक ४ ऑक्टोबर रोजी होणारी ही निवडणूक खुल्या पद्धतीने, मतपत्रिका अधिकृत निवडणूक प्रतिनिधीला दाखवून मतदान केले जाईल, अशी माहिती माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी maharashtra.city शी बोलतांना दिली.
राज्यसभा निवडणूक खुल्या पद्धतीने व्हावी यासाठी संसदेने घटनादुरुस्ती केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत निवडून आलेले सर्व आमदार अर्थात विधानसभा सदस्य हे राज्यसभा उमेदवाराच्या अधिकृत निवडणूक प्रतिनिधी (एजंट) ला मतपत्रिका दाखवून मतदान करतात, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
विधानसभेत एकूण 288 आमदार असले तरी देगलूर जि नांदेड येथील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे 10 एप्रिल रोजी निधन झाल्याने एकूण 287 मतदार मतदानास पात्र आहेत.
राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे एकूण मतदार भागीले एकूण जागा अधिक एक [287 / (1+1)] या सूत्रानुसार कोटा निश्चित होईल. यानुसार ज्या उमेदवाराला किमान 144 मते मिळतील, तो निवडून येईल.
राज्यसभा निवडणुकीत प्राधान्यक्रमाचा कोटा नसल्याने मतदानाची पहिली फेरी, दुसरी फेरी असे होणार नाही किंवा मतदाराचे अतिरिक्त मत दुसऱ्या क्रमाकांच्या उमेदवाराकडे वर्ग होणार नाही.
काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडून रजनी पाटील या उमेदवार आहेत. तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करतांना ‘आम्ही 163’ चा नारा दिला गेला होता आणि ते सगळे आमदार उपस्थित होते. भाजपचे स्वतःचे 106 आमदार आहेत. अपक्ष आणि अन्य 16 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपकडून केला जातो. याचा अर्थ भाजपकडे 122 चे संख्यबळ आहे.
निलंबित आमदारही मतदानास पात्र
निवडणूक आयोगाने एका आदेशानुसार भाजपच्या निलंबित 12 आमदारांना मतदान करता येईल असे स्पष्ट केले आहे. निलंबन कालावधीत या आमदारांना विधान भवन इमारतीच्या आत जाण्यासही बंदी आहे. त्यामुळे या आमदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विधनभवनाबाहेर मतदानाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
पक्षीय बलाबल (कोण कोणासोबत आहे?)
शिवसेना – 56
राष्ट्रवादी काँग्रेस – 53
काँग्रेस – 43
भारतीय जनता पक्ष – 106
बहुजन विकास आघाडी – 3 (भाजपसोबत)
समाजवादी पक्ष – 2 (आघाडीसोबत)
एम आय एम – 2 (आघाडीसोबत जातील)
प्रहार जनशक्ती – 2 (आघाडीसोबत)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1 (भाजपसोबत जातील)
सीपीआय (एम) – 1 (सहसा मतदान करत नाही)
शेतकरी कामगार पक्ष – 1 (आघाडीसोबत)
स्वाभिमानी पक्ष – 1 (आघाडीसोबत जातील)
राष्ट्रीय समाज पक्ष – 1 (भाजपसोबत)
जनसुराज्य शक्ती पक्ष – 1 (भाजपसोबत)
क्रांतिकारी समाज पक्ष – 1 (आघाडीसोबत)
अपक्ष – 13