@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिका रुग्णालये, प्रसुतीगृहे, आरोग्य केंद्रे, दवाखाने या ठिकाणी दररोज येणाऱ्या नागरिकांना, रुग्णांना तेथील विविध आरोग्य सुविधांबाबत योग्य ती माहिती तातडीने उपलब्ध होण्यासाठी, पालिकेने एक “ऑनलाईन अँप” तयार करावे, अशी मागणी समाजवादि पक्षाचे आमदार व नगरसेवक रईस शेख (SP MLA Rais Shaikh) यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेतर्फे (BMC) पालिका रुग्णालये, प्रसुतीगृहे, आरोग्य केंद्रे, दवाखाने या ठिकाणी दरवर्षी लाखो रुग्णांना मोफत, अगदी कमी शुल्कात विविध आजारांवर औषधोपचार दिले जातात. हजारो रुग्णांवर लहान- मोठया शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळतो. अनेकांचे प्राण वाचवले जातात.

पालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर आदि रुग्णालयात, प्रसुतीगृहात, दवाखाण्यात रायगड, विरार, नवी मुंबई, पालघर, वाशी, ठाणे, कल्याण आदि विविध भागांमधून बरेचसे आजारी नागरिक औषधोपचार करण्यासाठी येत असतात.

मात्र, अनेक रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना पालिका रुग्णालये, प्रसुतीगृहे, आरोग्य केंद्रे, दवाखाने या ठिकाणी कोणते विभाग, प्रयोगशाळा, सोनोग्राफी, एमआरआय, बाहयरुग्ण विभाग हे नेमके कुठे असतात, कितव्या मजल्यावर असतात, संबंधित डॉक्टर, नर्स कुठे असतात, त्यांना कसे संपर्क करावा, याबाबत काहीच माहिती नसते. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्यास काही रुग्णांचा रुग्णालयातच मृत्यू होतो.

त्यामुळे योग्य ती माहिती तातडीने उपलब्ध होण्यासाठी व त्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी पालिकेने एक “ऑनलाईन अँप” (online App) तयार करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार व नगरसेवक रईस शेख यांनी केली आहे.

ही मागणी पालिका सभागृहात एकमताने मंजूर झाल्यास व त्यास पालिका आयुक्तांनी ग्रीन सिग्नल दिल्यास लाखो नागरिकांना त्याचा खूप लाभ होईल, असे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here