ब्रेन स्ट्रोकमुळे एअर अम्ब्युलंसने तात्काळ हलवले
Twitter: @maharashtracity
मुंबई: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुलगा अनुज पटेल यांना एअर अँब्युलन्सने मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सोमवारी दाखल करण्यात आले. अनुज यांना ३० एप्रिल म्हणजे रविवारी दुपारी ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे त्यांना त्वरीत अहमदाबाद येथील वैष्णोदेवी सर्कल परिसरातील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी काही उपचार केल्यानंतर त्यांना मुंबईत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आगामी सर्व कार्यक्रम आणि दौरे रद्द करुन मुंबईत थांबणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, अहमदाबाद येथील केडी हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी प्रक्रियेतील सर्व उपचार दिल्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यात आली. त्यानंतर अनुज यांना मुंबई हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे सोमवारी एअर
अँब्युलन्सने पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे हिंदुजा हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून सर्जरीनंतर त्यांना आयसीयू विभागात बरे होईल तोपर्यंत ठेवण्यात येणार आहे.
सध्या अनुज यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र मुलाच्या ब्रेन स्ट्रोकनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ते सोमवारी गुजरात गौरव दिन सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनीच गुजरात राज्याचा देखील गौरव दिन असतो. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे आरोग्य मंत्री ऋषिकेश भाई पटेल जामनगर येथे झालेल्या गुजरात गौरव दिनाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिले.
अनुज यांना ब्रेन स्ट्रोक झाला तेव्हा मुख्यमंत्री “मन की बात” कार्यक्रम ऐकण्यासाठी शीलज येथे गेले होते. अनुज पटेल यांना अहमदाबाद केडी रुग्णालयात नेण्यात आल्यावर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही रुग्णालयात पोहोचले. तेव्हापासून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तेथे अनुज पटेलची काळजी घेत होते. रात्री अनुज पटेलवर शस्त्रक्रियाही करण्यात आली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना अनुज पटेल यांच्याशिवाय एक मुलगी आहे.