अर्धचेतन अवस्था कायम; मात्र प्रकृती स्थिर
Twitter: @maharashtracity
मुंबई: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना २२ मे रोजी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पंधरा दिवसाच्या उपचारानंतर जोशी यांना आयसीयू विभागातून बाहेर हलविण्यात आले. दरम्यान, जोशी हे अर्धचेतन अवस्थेत असले तरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे हिंदुजा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मेंदूतील रक्तस्त्रावाच्या तक्रारीने २२ मे रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सेमीकोमाच्या गंभीर स्थितीत आयसीयूत उपचार सुरु करण्यात आले. तसेच त्यांच्या मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याचे निदान करण्यात आले होते. उपचारानंतर मेंदूतील रक्तस्त्राव स्थिर करण्यात आला असल्याचे त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, सोमवारी सकाळी जोशी यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, त्यांची अर्धचेतन अवस्था कायम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयातील डॉक्टरांची टीम जोशी यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.