@maharashtracity

चौकशीसह ठेकेदाराची बिलाची उर्वरीत रक्कम अदा न करण्याची मागणी

धुळे: धुळे शहरात 131.54 कोटी रुपये खर्चाच्या भुमिगत गटार योजनेचे (underground drainage scheme) काम देवपूर भागात सुरु असून हे काम निष्कृष्ट असल्याचा दावा शिवसेनेने (Shiv Sena) केला आहे.

या कामातील 80 टक्के रक्कम ठेकेदाराने (Contractor) आधीच काढून घेतली असून आणखी दहा टक्के रकमेची मागणी केली आहे. शिवाय पैशांसाठी कामही थांबविले आहे. या पुढील उर्वरीत रक्कम अदा न करता झालेल्या सर्वच कामाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

यासंदर्भात, शिवसेनेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (Maharashtra Jeevan Pradhikaran – MJP) कार्यकारी तथा अधीक्षक अभियंता निकम यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार देवपुरात 131.54 कोटी रुपये खर्चाची भुमिगत गटार योजना सुरु आहे.

147 कि.मी.च्या या योजनेचे 125 कि.मी. काम झाल्याचे सांगितले जात आहे. अद्याप 22 कि.मी.चे काम बाकी असताना ठेकेदाराने 95 कोटी रुपये काढून घेतले आहेत. आता चेंबर व मेन चेंबरच्या कामाचे 28 कोटी रुपये बिलाची मागणी करीत जवळपास दिवाळीपासून काम थांबविले आहे.

ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार त्याने 14 हजार चेंबर केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात हे काम अगदीच निष्कृष्ट आहे. देवपुरातील अशाच एका चेंबरच्या झाकणाला मोठे भगदाड पडले असून हे काम किती कमकुवत आहे, हे दाखविण्यासाठी शिवसेनेने कुदळीच्या एका दणक्यात हे झाकण होत्याचे नव्हते करुन दाखविले.

संपूर्ण कामाची चौकशी करुन मगच बिल द्यावे, अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे महेश मिस्तरी, सतिष महाले, डॉ.सुशिल महाजन, मनोज मोरे, देविदास लोणारी, संजय वाल्हे, पंकज चौधरी, संदीप चौधरी, दिनेश पाटील, गोल्डन कढरे, शेखर बडगुजर, निलेश मराठे, किशोर माळी, गुलाब सोनवणे, सुयोग मोरे, योगेश थोरात, वैभव पाटील, शुभम मतकर आदी शिवसैनिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here