@maharashtracity

ठाणे : ठाणे (Thane) जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील चरिव गावातील भूषण गायकर हा तरुण पुरात वाहून जाणाऱ्या मंदिरातील पालखीला वाचवताना सर्पदंश झाल्याने मृत्युमुखी पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Guardian minister Eknath Shinde) यांनी पालकर कुटुंबाचे पालकत्व स्विकारले आहे.

 चरिव गावाजवळून वाहणाऱ्या काणवी नदीची पाणीपातळी वाढल्याने गावाजवळच्या मंदिरातील पालखी वाहून जात असताना ती बाहेर काढण्यासाठी गेलेल्या भूषण गायकर या २५ वर्षीय तरुणाचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. 

या तरुणाच्या आईवडीलांचे गतवर्षी कोरोनाने निधन झाल्यानंतर कुटूंबाला हा दुसरा मोठा धक्का बसला. भूषणच्या अचानक जाण्याने आता या घरात त्याचे वृद्ध आजोबा आणि लहान बहीण एवढेच शिल्लक राहिले आहेत. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यासोबतच तातडीची मदत म्हणून या कुटूंबाला शिवसेनेच्यावतीने ४ लाख रुपयांची मदत करण्यात आली. याशिवाय अजून ४ लाख रुपये जिल्हा आपत्ती निवारण निधीतून देण्याचे निर्देश शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

त्यासोबतच त्याच्या धाकट्या बहिणीचे पालकत्व स्वीकारून तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेनेच्या वतीने उचलण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here