मुख्यमंत्री गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांचा थेट आरोप

@maharashtracity

By अनंत नलावडे

मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोणी काही कानात सांगतो त्याप्रमाणे उड्या मारणे बंद करावे असा सल्ला देतानाच, तरुणांची माथी भडकवण्याचे काम आदित्य करत आहेत, असा थेट आरोप मुख्यमंत्री शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केला.

महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी परराज्यात मुलाखती का असा प्रश्न करणाऱ्या आदित्य ठाकरे (Yuva Sena Chief Aaditya Thackeray) यांनी चित्रपटसृष्टीत सुशांतसिंग, दिशा सालीयनसारखी प्रकरणे घडत असतील तर लोक कशी येतील याचे उत्तर द्यावे, असा खडा व रोखठोक सवालही त्यांनी यावेळी विचारला.

शिवसेना भवन येथे काल आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील प्रकल्पासाठी नियुक्त असलेल्या कंपनीने चेन्नई व इतर राज्यात मुलाखती घेतल्याचा आरोप केला होता. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pawaskar) यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. संबंधित कंपनीने महाराष्ट्रात दोन वेळा तर मुंबईत तीन ठिकाणी मुलाखती घेतल्या होत्या. कॅबिनेट मंत्री राहूनही कोणतीही माहिती न घेता बोलणे ही लाजीरवाणी गोष्ट असल्याची टीकाही पावसकर यांनी यावेळी केली.

पश्चिम बंगाल आणि चेन्नईमधून विद्यार्थी जास्त मिळतात. त्यामुळे त्या कंपनीने ९ जागांसाठीच्या मुलाखती राज्याबाहेर घेतल्या. सुशांतसिंग (Sushant Singh Rajput), दिशासालीयन या सारख्या केसेस महाराष्ट्रात घडत असतील तर राज्यात अन्य लोक येतील का? असा परखड सवालही त्यांनी केला.

उद्धव यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे ही दसरा मेळावा घेणार आहेत. यापूर्वीच्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुखांचे विचार लुटण्यासाठी लोक येत असत. आता बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्यात येत असून कोथळा, वार, घुसून मारणे असे सोडल्यास उद्धव यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही असा सज्जड टोलाही पावसकर यांनी लगावला.

आमचा मेळावा होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्याला (Dusshera Melawa) शिवाजी पार्क मैदानात परवानगीसाठी सरकारने कोणताही दबाव महापालिका अधिकाऱ्यांवर आणला नाही. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेणार म्हणतात. पण त्यासाठी कोणता गनिमी कावा वापरणार याबाबत स्पष्टपणे काहीच सांगत नाही. परंतु, आमचा मेळावा शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे होण्यासाठी आम्हीही शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here