Twitter : @vivekbhavsar
मुंबई: राज्यात आणि देशात १९६७ पासून राजकारणात आहे. आतापर्यंत अनेक पक्ष चिन्हे बदलली. त्यामुळे घड्याळ चिन्हावर ते दावा करत असले तरी चिंता करू नका. मी घड्याळ हे पक्ष चिन्ह जाऊ देणार नाही, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यात जगवतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना जाणीव करून दिली की, त्यांनी लावलेल्या बॅनरवर माझा फोटो लावलेला आहे. कारण त्यांचे नाणे चालणार नाही याची त्यांना खात्री अशी टीका शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली.
अजित पवार आणि त्यांच्या सोबत पक्ष सोडून गेलेले आणि शिंदे – फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील त्यांच्या एकही जुन्या सहकाऱ्यांचे नाव न घेता ८३ वर्षीय शरद पवार यांनी कठोर शब्दात टीका केली.
अजित पवार यांच्या समर्थकांचा आज सकाळी छगन भुजबळ यांच्या एम इ टी या वांद्र्यातील शैक्षणिक संकुलात मेळावा झाला. या मेळाव्यातील जुन्या सहकाऱ्यांच्या भाषणातील मुद्द्यांचा आधार घेत शरद पवार यांनी त्यांच्यावर शाब्दिक आसूड ओढले. आमच्या सहकाऱ्यांनी आधी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आज तेच शिंदे यांच्यासोबत गेले.
शिवसेनेसोबत गेले अशी टीका करणारे आज त्याच सेनेबरोबर आणि भाजपसोबत गेले, अशी टीका करताना शरद पवार म्हणाले, शिवसेनेचे हिंदुत्व सर्व जातींना सोबत घेऊन जाणारे आहे. तर भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी आणि मनुवादी आहे. त्यांच्या राजवटीत राज्यातील अनेक दंगली पेटल्या. महिला सुरक्षित नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अजित पवार यांच्या मेळाव्यात काही नेत्यांनी शरद पवार यांचा उल्लेख त्यांचे विठ्ठल असा केला. हा संदर्भ घेऊन पवार म्हणाले, एकीकडे विठ्ठल म्हणायचे आणि दुर्लक्ष झाले म्हणायचे याला काही अर्थ नाही. विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला जावे लागते याची आठवण त्यांनी करून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्ट आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती. या भ्रष्ट नेत्यांना सोडणार नाही असा इशारा मोदी यांनी गेल्याच आठवड्यात दिला होता. हाच धागा पकडून शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्ट आहे तर या पक्षाला सरकारमध्ये का सहभागी करून घेतले? चौकशी का केली नाही?
जे गेले त्यांना जाऊ द्या, तिकडे सुखी राहू द्या, असे सांगून शरद पवार म्हणाले, २४ वर्षात खूप नेते तयार केले. संपूर्ण राज्यात पुन्हा दौरा करतात आणि नव्याने पक्ष बांधणी करणार अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये विश्वास जगवला.
उषःकाल होता होता
काळरात्र झाली.
अरे पुन्हा आयुष्यांच्या
पेटवा मशाली..
या सुरेश भटांच्या कवितेच्या ओळी वाचून पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीचे शिवधनुष्य उचलले.