@maharashtracity
मुंबई: भाजपचे मालाड , प्रभाग क्रमांक ४५ चे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उप महापौर डॉ. राम बारोट (७५) यांचे रविवारी दुपारच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नजीकच्या स्मशानभूमीत २७ सप्टेंबर, सोमवारी सकाळी विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Dr Ram Barot of BJP died)
डॉ बारोट सन १९९२ पासून सलग सहा वेळा मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी महापालिकेत उप महापौरपद (Deputy Mayor), सुधार समिती, शिक्षण समिती आणि आरोग्य समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते.
त्याचप्रमाणे, त्यांनी मालाड विधानसभा मतदारसंघामधून (Malad assembly constituency) आमदारकीसाठी निवडणूक लढवली होती. मालाड पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या सबवेसाठी त्यांचे मोठे योगदान लाभले.
डॉ. राम बारोट यांनी नगरसेवकपद भूषवताना आपल्या विभागातील जनतेसाठी चांगले रस्ते बनविले, पाणीपुरवठा सुधारणा, उद्याने, शिक्षण आदीबाबतची कामे केली.
वयाच्या ७५ व्या वर्षातही ते सतत कार्यरत होते. कोणत्याही सामाजिक कार्यात ते स्वतःला झोकून देत असत. डॉ. बारोट यांच्या निधनामुळे भाजपने एक सच्चा कार्यकर्ता गमावला आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपचे नगरसेवक सुनील यादव यांचे दुःखद निधन झाले होते. त्यामुळे भाजपला एक मोठा धक्का बसला होता. या धक्क्यामधून सावरत असतानाच आता ज्येष्ठ नगरसेवक डॉ. राम बारोट यांच्या निधनाने भाजपला (BJP) गेल्या काही दिवसातील हा दुसरा धक्का बसला असून तो पचवणे भाजपला काहीसे जड जाणार आहे.