@maharashtracity

मुंबई: परळ, नरे पार्क मैदान परिसरात भटक्या कुत्र्यांनी (stray dogs) दिवस- रात्र हैदोस घातला आहे. पादचारी, सर्वसामान्य नागरिक, दुचाकी वाहन चालक आदींच्या अंगावर धावून जातात. अनेक लोकांना या भटक्या व उपद्रवी कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा पालिका प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सिंधू मसुरकर (Shiv Sena Corporator Sindhu Masurkar) यांनी, “एफ/ दक्षिण आणि एफ/ उत्तर” प्रभाग समितीच्या बैठकीत केली.

तत्पूर्वी, शिवसेना नगरसेवक दत्ताराम पोंगडे (Shiv Sena corporator Dattaram Pongade) यांनी, त्यांच्या विभागातील भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार करीत या विषयाला वाचा फोडली व पालिकेने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

त्यामुळे आता भटक्या कुत्र्यांची समस्या ऐरणीवर आली असून या भटक्या कुत्र्यांच्या संख्येला व त्रासाला नियंत्रणात आणण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका सर्वपक्षीय नगरसेवकांकडून केली जात आहे.

मुंबईत अंदाजे १ लाखांपेक्षाही जास्त भटके व पाळीव कुत्रे आहेत. मात्र पालिका दरबारी त्यांची नोंद निटपणे होत नसल्याने ती संख्या कमी दाखविण्यात येते. भटक्या कुत्र्यांमुळे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पेपरवाले, दुध विक्रेते, कामावर जाणारे चाकरमानी, शाळा, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, पादचारी आदींना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते.

भटक्या, चावा घेणाऱ्या कुत्र्यांना पकडून पालिका त्यांचे निर्बीजीकरण (sterilisation) कारण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. त्यासाठी नेमलेल्या सामाजिक संस्थांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. मात्र भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि त्यांची वाढती संख्या काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक पालिका सभागृहात याबाबतची समस्या पोटतिडकीने मांडतात. मात्र कुत्र्यांची समस्या काही कमी होत नाही.

गेल्या डिसेंबर महिन्यातच शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी, भटक्या, उपद्रवी कुत्र्यांचा त्रास कमी होणासाठी औरंगाबाद महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation – AMC) धर्तीवर मुंबईतही भटक्या जनावरांप्रमाणे कुत्र्यांनाही कोंडवाड्यात ठेवावे. ज्याप्रमाणे वाघांना दत्तक दिले जाते त्याप्रमाणे भटक्या कुत्र्यांनाही प्राणीमित्र संस्थांना दत्तक म्हणून देण्यात यावे, अशी मागणी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. त्यास मंजुरी मिळाली आहे.

आता पालिका नेमकी काय नवीन उपाययोजना करणार याकडे सर्व नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले आहे.

“माझ्या विभागातील नरे पार्क परिसरात दुचाकीस्वार, नागरिकांना, पादचाऱ्यांना भटक्या कुत्र्यांचा खूप त्रास होत आहे. अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी पालिकेकडे केली आहे.”

  • सिंधू मसुरकर, नगरसेविका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here