मुंबई महापालिका व बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट यांच्यात सामंजस्य करार
मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता मिशनचा शुभारंभ
मुंबई: मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक सेवा- सुविधांमध्ये आमूलाग्र बदल करुन विद्यार्थ्यांच्या चौफेर विकासासाठी शिक्षणासोबत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये आता आर्थिक साक्षरता अभ्यासक्रमाच्या रुपाने मोलाची भर पडली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसह समाजासाठी, देशासाठी महत्त्वाचा आहे.
मुंबईप्रमाणेच राज्यातील इतर शहरांमध्ये, शाळांमध्ये आणि शेतकऱ्यांपर्यंतही आर्थिक साक्षरता मिशन नेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केले आहे.
मुंबई महापालिका (BMC) व बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट लि. च्या यांच्या संयुक्त प्रयत्नातून आर्थिक साक्षरता मिशन हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत महापालिकेच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची पुस्तिकादेखील यानिमित्ताने प्रकाशित करण्यात आली.
अवघ्या ४५ दिवसांमध्ये महापालिकेच्या शिक्षण खात्याने आर्थिक साक्षरता मिशन प्रत्यक्ष सुरु केले असल्याचे सांगून आदित्य ठाकरे यांनी त्याबद्दल शिक्षण खात्याचे विशेष कौतूक केले.
या संदर्भात एक सामंजस्य करारही दोन्ही संस्थामध्ये करण्यात आला आहे. या मिशनचा शुभारंभ मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीतील आंतरराष्ट्रीय सभागृहात सोमवारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी, शिवसेना खा.अरविंद सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा संध्या दोशी-सक्रे, सह आयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीश दत्ता, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी राजू तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्टॉक मार्केटला जुगार मानण्याचा समज दूर व्हावा
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत आहे. मुळात भांडवली बाजार अर्थात स्टॉक मार्केटला जुगार मानण्याचा समज आता दूर झाला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्यातील इतर शाळांमध्ये तसेच शेतकऱ्यांपर्यंत देखील आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आणखी ३ वर्षांनी दीडशे वर्ष पूर्ण करीत असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने त्यासाठी पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीमध्ये पर्यटकांना येता यावे, यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना टॅबनंतर आता स्मार्टबोर्ड मिळणार
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरुन दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी ५४ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना टॅब दिले गेले आहेत. संगणक प्रयोगशाळा, खगोलीय प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. ६०० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उपक्रम राबवला जात आहे. आता स्मार्टबोर्ड उपलब्ध करुन दिले जातील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
महिलांनाही आर्थिक स्वावलंबानाचे धडे देणे आवश्यक -: आशिष कुमार चौहान
विद्यार्थ्यांप्रमाणेच महिलांना देखील आर्थिक स्वावलंबानाचे धडे दिले जाणे गरजेचे आहे, असे मत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे आशिष कुमार चौहान यांनी यावेळी व्यक्त केले.
१४७ वर्षांची परंपरा असलेले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे जगात भांडवली बाजारांच्या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे. भारतातील एकूण राष्ट्रीय संपत्तीच्या ३० टक्के संपत्ती या एकट्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमुळे निर्माण झाली आहे. देशातील १० कोटी लोक आता भांडवली बाजारात गुंतवणूक करतात. देशातील प्रत्येक नागरिकाला पैसा कसा कमवावा, बचत कशी करावी, गुंतवणुकीतून संपत्तीची वृद्धी कशी करावी व आर्थिक संकट टाळण्यासाठी कर्ज आणि उधारीची परतफेड कशी करावी, हे कळणे आवश्यक आहे, असे आशिष कुमार चौहान यांनी म्हटले आहे.