@maharashtracity

संजय राऊत यांचा फडणवीस, कंबोज, किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) सुरू असलेल्या चौकशीमुळे संतप्त झालेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप नेते किरीट सोमय्या, नील किरीट सोमय्या, सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांच्या काळात महा आयटी (Maha IT) विभागात 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी केला.

लवकरच जेलमध्ये जाणार असलेल्या भाजपातील साडेतीन नेत्यांची नावे उघड करू, असे वक्तव्य संजय राऊत यांनी सोमवारी केले होते. त्यामुळे ते साडेतीन नेते कोण याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र, ते नेते उद्या सांगू, असे राऊत यांनी सांगितल्याने अनेकांची निराशा झाली असेल.

दरम्यान, राऊत म्हणाले की महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) पाडण्यासाठी भाजपने (BJP) आपली मदत मागितली होती. “तुम्ही बाजूला व्हा आणि मदत करा. अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s Rule) लागू करू आणि तुमच्यामागे चौकशी लावू,” असे सांगून राऊत म्हणाले की त्यांनी नकार दिल्याने पुढच्या तीन दिवसात त्यांच्यामागे ईडी चौकशी लावण्यात आली.

“(माझ्या मुलीच्या लग्नात आलेले) मेहंदीवाले, मंडपवाले यांची चौकशी करण्यात आली. माझ्या टेलरची चौकशी करून किती कपडे शिवले अशी विचारणा करण्यात आली. 12 – 12 तास डांबून ठेवण्यात आले,” असे राऊत यांनी सांगितले.

राऊत म्हणाले, आता ईडीचे अधिकारी बँकेत जाऊन त्यांच्या खात्यातील मागील 20 वर्षाची माहिती मागवली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करतांना संजय राऊत म्हणाले की फडणवीस यांच्या काळात महा आयटी विभागात 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला.

मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे फडणवीस यांचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ असून ते फडणवीस यांना बुडवतील, असा दावा राऊत यांनी केला. पत्रा चाळीची (Patra Chawl) जमीन कंबोज यांनी कवडीमोल भावाने खरेदी केली आणि ही खरेदी करण्यासाठी पंजाब अँड महाराष्ट्र बँकेतील (PMC Bank scam) घोटाळ्याचा पैसा वापरण्यात आला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान (Rakesh Wadhwan) याची आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचा दावा करून संजय राऊत म्हणाले, वाधवान याला धमकावून सोमय्या यांनी 80 ते 100 कोटी रुपये वसुल केले तसेच वसईत (Vasai) भागीदारीत व्यवसाय सुरू केले.

राऊत यांनी माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचे नाव न घेता आरोप केला की मुनगंटीवार यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात वनाचा सेट उभारला होता आणि त्यासाठी वापरलेल्या कार्पेटसाठी 9.50 कोटी रुपये खर्च केले होते.

दरम्यान, दादर (Dadar) येथील शिवसेना भवनाबाहेर (Shiv Sena Bhavan) राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here