@vivekbhavsar
मुंबई: सहसा बिनविरोध होणारी राज्यसभा निवडणूक यावेळी भारतीय जनता पक्षाने अतिरिक्त तिसरा आणि सत्ताधारी शिवसेनेने दुसरा उमेदवार दिल्याने ही निवडणूक प्रत्यक्ष मतदानाने होणार आहे. सेना आणि भाजपने त्यांचे अतिरिक्त उमेदवार निवडून येतील असा दावा केला असला तरी दोन्ही पक्षात धाकधूक असेल. दरम्यान, ही निवडणूक प्रक्रिया कशी असेल हे जाणून घेऊ.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकूण रिक्त जागेपेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यास निवडणूक घेतली जाते. राज्यसभेत खुल्या पद्धतीने मतदान घेतले जाते. म्हणजे विधान सभा सदस्याला त्याच्या पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीला मतदान पत्रिका दाखवावी लागते.
यंदा राज्यसभेत सहा जागेसाठी उमेदवार असून मत पत्रिकेवर सातही उमेदवारांची नावे असतील. पसंतीक्रम पद्धतीने मतदान केले जाते. उदाहरण द्यायचे झाल्यास सेनेच्या आमदाराला पहिली पसंती म्हणून संजय राऊत नावापुढे १ क्रमांक टाकावा लागेल. तर दुसरी पसंती म्हणून संजय पवार यांच्या नावापुढे २ हा क्रमांक टाकावा लागेल.
पक्षाच्या आमदारांना त्यांना बजावण्यात आलेला व्हीप केवळ त्यांच्या उमेदवारापुरता मर्यादित असल्याने सेनेच्या आमदारांनी तिसऱ्या पासून सातव्या पर्यंत कोणत्या उमेदवाराला कोणता पसंतीक्रम द्यावा याचे बंधन नसेल. या मतदान स्वातंत्र्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात धाकधूक आहे.
म्हणूनच विजयासाठी ४२ मतांची आवश्यकता असतानाही काँग्रेसने त्यांच्या सगळ्या ४४ आमदारांना काँग्रेस उमेदवार प्रतापगढी यांनाच मते द्या अशा सूचना केल्या आहेत. तसा व्हीप काढला जाऊ शकतो.
त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना ४५ मते मिळावीत अशी मागणी केल्याचे समजते. ५३ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी पक्षाने ४५ मते पटेल यांना दिली तर सेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांच्यासाठी फक्त ८ अतिरिक्त मते शिल्लक राहतील. तर काँग्रेसकडे एकही अतिरिक्त मत शिल्लक राहणार नाही. अपक्ष आणि छोट्या पक्षाचे एकूण १३ आमदार महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिले असेल तरी ते पवार यांना मतदान करतीलच याची कोणाला खात्री नाही.
अपक्ष आमदारांना व्हीप लागू होत नाही, त्यामुळे ते कोणालाही मतदन करू शकतील. मात्र, सहसा सत्ताधारी पक्षाकडून अपक्ष आमदारांना त्यांच्या मतदार संघातील विविध विकास कामे करून देण्याचे आश्वासन दिले जाते. कामे मार्गी लागत असल्याने छोटे पक्ष आणि अपक्ष सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान करण्यास तयार होतात.
मग भीती कसली?
एखाद्या पक्षाला आपलाच उमेदवार पडायचा असेल तर मत पत्रिकेत जाणीवपूर्वक चुका करणे, मत पत्रिकेवर सही करणे असे काहीही करून मत बाद होतील, यांची काळजी घेतली जाऊ शकेल. बाहेरचा उमेदवार लादलेल्या काँग्रेसला हीच भीती आहे. कोरोना झाला, म्हणून मतदानाला येऊ शकत नाही, आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले असे कारण देऊन मतदानाला जायचेच नाही, ही कारणे दाखवता येऊ नये यासाठी काँग्रेसच्या आमदारांनाही एकत्र ठेवण्याची काळजी घेतली जात आहे.
शेवटी सातवा उमेदवाराची पूर्ण मदार अपक्ष आमदारांवर असल्याने या आमदारांचे महत्व वाढले आहे. हे आमदार सेनेच्या संजय पवार यांना निवडून देतात की भाजपच्या धनंजय महाडिक यांच्या पारड्यात मतदान करतील याची उत्सुकता १० तारखेपर्यंत कायम राहणार आहे.