@maharashtraciy

मुंबई: कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने मंगळवारी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे पालिका मुख्यालयातील अधिकारी, सुरक्षारक्षक, कर्मचारी हे सावध झाले. (Action against NCP corporator Kaptan Malik for violation of covid guidelines)

मुंबईत सध्या कोरोना नियंत्रणात आलेला आहे. त्यामुळेच राज्य सरकारने शाळा, कनिष्ठ महाविद्यालये ४ ऑक्टोबरपासून सुरू केले. ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळांचे दरवाजेही खुले करण्यात येणार आहेत.

अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे बंद झालेला नाही. त्यामुळेच आजही कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांनी तोंडवर मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

मात्र मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक हे मंगळवारी सायंकाळी ५.४० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकासमोरील (सीएसएमटी) मुंबई महापालिका मुख्यालयाच्या आवारात गेट क्रमांक ६ समोर एका पालिका सुरक्षारक्षकाशी बोलत असताना त्यांचा तोंडावरील मास्क नाकावर नव्हता. तो मास्क तोंडाच्या खाली म्हणजे मानेवर आलेला होता.

Also Read: प्रकल्पबाधितांना पर्यायी घरांऐवजी मोबदला

त्याच वेळी पालिका इमारतीजवळून जाणाऱ्या पोलिसांच्या पथकाला (Mumbai Police squad) नगरसेवक कप्तान मलिक यांच्या नाकावर मास्क नसल्याचे आढळून आले. या पोलीस पथकातील पोलीस अधिकाऱ्याने नगरसेवक कप्तान मलिक यांना हटकले व त्यांना जवळ बोलावून जाब विचारला.

यावेळी, नगरसेवक कप्तान मलिक यांनी, मास्क तोंडाखाली आल्याबाबत स्पष्टीकरण देण्याचा व आपली बाजू सावरण्याचा, मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी नियमांवर बोट ठेवत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत २०० रुपयांची पावती फाडली व त्यांच्या हातात टेकवली. (NCP corporator Kaptan Malik paid fine for violation of covid guidelines)

नगरसेवक मलिक यांनी नाईलाजाने त्यांना ५०० ची नोट काढून देत दंडाची रक्कम मुकाटपणे भरली.

पोलिसांनी नगरसेवकांवर केलेल्या या दंडात्मक कारवाईमुळे पालिका आवारातील पालिका सुरक्षारक्षक, कर्मचारी यांच्या भुवया उंचावल्या व तेही सतर्क झाले.

“माझ्या तोंडावरील मास्क खाली आलेला होता. त्यामुळे मला पोलिसांनी हटकले. त्यांनी मला दंडाची रक्कम भरायला सांगितली. शेवटी कायद्याचे पालन तर करायलाच पाहिजे.

  • कप्तान मलिक, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here