@maharashtracity

धुळे: धुळे जिल्हा नियोजन समितीकडे (DPC) शिल्लक असलेल्या कोट्यावधींच्या निधीतून महानगर पालिकेच्या (DMC) दवाखान्यांमध्ये आधुनिक लॅब उभारणे, तसेच डिजिटल एक्सरे मशीन, सिटीस्कॅन, एमआरआय व इतर आवश्यक मशीन खरेदी करुन रुग्णांना अद्ययावत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी शिवसेनेने मनपा आयुक्तांकडे केली आहे. (Shiv Sena demands to provide machinery in corporation’s hospitals through DPC fund)

शिवसेनेच्यावतीने गुरुवारी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा (third wave of corona) सामना करण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी तब्बल 210 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे.

त्यापैकी 63 कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीकडे पडून आहेत. राज्य शासनाचा मूळ उद्देशच स्थानिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा आहे. परंतु जिल्ह्यातील निष्क्रिय आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेमुळे या निधीतील एक रुपयाही खर्च झालेला नाही.

महापालिकेची आरोग्य यंत्रणा मजबूत व बळकट करण्यासाठी मनपाची आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल एक्सरे मशीन, हायटेक सिटीस्कॅन मशीन व हायटेक एमआरआय मशीनची मागणी करून मुंबईच्या धर्तीवर धुळे मनपाच्या मालकीचे दवाखाने सुसज्ज करावे.

धुळेकर नागरिकांना खाजगी सेंटरमध्ये न परवडणारे दराचा सामना करावा लागणार नाही. पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत किंवा अल्प दरात या सुविधा उपलब्ध करून देता येतील. त्यामुळे नागरिकांच्या होणार्‍या आर्थिक शोषणावर अटकाव होईल.

यामुळे मनपाच्या मालकीच्या दवाखान्यांमध्ये वरील आधुनिक यंत्राची मागणी करावी व नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, अशी मागणी धुळे जिल्हा सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख मनोज मोरे, डॉ.सुशील महाजन, पुरुषोत्तम जाधव, संदीप चव्हाण, संजय जगताप, बाळू आगलावे, संजय वाल्हे, शेखर बडगुजर, योगेश चौधरी, देवा लोणारी, गुलाब सोनावणे, निलेश मराठे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here