@maharashtracity
नागपूर: स्वतंत्र विदर्भ राज्य होणे हे पूर्णतः शक्य असून या आंदोलनासाठी एका परिपूर्ण रणनीतीची गरज आहे. कुठलाही प्रस्थापित राजकीय पक्ष जो सत्तेत असो किंवा विरोधात हा विदर्भ राज्य देणार नाही, अशी टीका करतानाच विदर्भ राज्य हे सध्या विदर्भ राज्यासाठी कार्यरत असलेल्या विविध पक्ष, संघटना आणि समर्पित विदर्भवादी कार्यकर्त्यांकडूनच होईल, असा विश्वास राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला.
नागपुरात बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्याचा रेटा रचनात्मक पद्धतीने पुढे नेल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य लवकरच अस्तित्वात येऊ शकेल. विदर्भातील जनतेने आपल्या सूचना द्याव्यात. त्यात रोजगार, शेतकरी, उद्योग, खनिज, पर्यटन, कुपोषण असे सर्वच मुद्दे समाविष्ट करावेत. त्यानुसार सर्वंकष रणनीती तयार करून विदर्भाचा मुद्दा पुढे नेता येईल. विदर्भासाठी १०० वर्षे वाट बघितली, अजून १०० दिवस वाट बघितल्यास आंदोलनाचे एक पक्के मॉडेल तयार करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.
प्रशांत किशोर म्हणाले, त्यासाठी वारंवार बैठकी घेण्यात येतील. ३६० डिग्रीचा विचार करून, विदर्भाच्या भावनेला एका साच्यात टाकून मूर्तरूप द्यायचे आहे… आणि हे निश्चितपणे होणे आहे. सुनियोजित पद्धतीने विदर्भ राज्य १००% निर्माण होणार. विदर्भासाठी कुठल्याही पक्षासोबत काम करीत नसून वैदर्भीय जनतेची दयनीय अवस्था आपल्या गैर-राजनीतिक कार्यशैलीने व रणनीतीने दूर करणार.
नागपूर वगळल्यास विदर्भाची स्थिती बिहारसारखीच आहे, अशी टीका करून प्रशांत किशोर म्हणाले, तेलंगणा राज्यातून हैदराबाद वेगळे केल्यास त्या राज्याची स्थिती विदर्भासारखीच आहे. विदर्भाची चळवळ धारदार व्हावी, जेणेकरून त्या चळवळीचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचावा. समाजाला जागृत केल्यास ते सहज शक्य आहे. वेगळ्या विदर्भाचा रस्ता समाजातून उघडेल. विदर्भातील १० खासदार विदर्भ राज्य देऊ शकत नाही. त्यासाठी २.५० कोटी जनता या चळवळीचा हिस्सा होणे गरजेचे आहे. जनतेच्या मनात विश्वास आणि आशा निर्माण केल्यास विदर्भ राज्य मिळणार.
विदर्भवादी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात युवकांनी या आंदोलनात भाग घ्यावा. जाती-धर्माला बाजूला सारून विदर्भप्रेमींना एकत्र आणावे. २-३ वर्षे कठोर मेहनत केल्यास विदर्भ राज्य सहज शक्य आहे, त्यासाठी आक्रमक होण्याची गरज नाही. यश मिळविण्यासाठी मी हे काम हाती घेतले आहे. त्यासाठी कठोर परिश्रम करायची तयारी आहे. सर्वांनी मिळून संपूर्ण ताकद, समर्पण, स्थिरता, गंभीरता आणि प्रामाणिकपणे काम करायचे आहे. विदर्भ राज्य निर्माण करणे इतके कठीण नाही, जितके वाटत आहे. हे जुने आंदोलन आहे. ज्या राजकारणी नेत्यांना जनतेने निवडून दिले आहे, ते जनतेचेच ऐकेनासे झाले आहेत आणि जनता दयनीय जीवन जगात आहे. पुढील बैठक १००० विदर्भवाद्यांची असावी, अशी अपेक्षा माजी आमदार आशिषराव र. देशमुख यांनी व्यक्त केली.
उलट विदर्भाचे आंदोलन आता कमजोर पडलं आहे. विदर्भ हे स्वतंत्र राज्य व्हावे, ही येथील जनतेच्या मनातील इच्छा आहे. यापूर्वी कितीतरी माध्यमातून ही बाब पुढे आली आहे. विदर्भ हे स्वतंत्र राज्य होण्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी प्रबळ रणनीती गरजेची आहे. युवकांनी व विदर्भप्रेमींनी विदर्भ राज्यासाठी जागृत व्हावे. विदर्भ राज्य हे विकासाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असून आर्थिक समृद्धीसाठी आम्ही विदर्भ राज्य निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, अशी भूमिका माजी आमदार व विदर्भवादी नेते डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी या बैठकीत विशद केली.
यावेळी विदर्भातील ११ ही जिल्ह्यांतून विदर्भवादी नेते या बैठकीत सामील झाले होते. त्यांनीसुद्धा आपले मत व सूचना यावेळी सर्वांसमक्ष मांडल्या.