@maharashtracity
योग्य वेळी घरी सोडण्यात येणार असल्याची डॉक्टरांची माहिती
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू असून त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेचे दुखणे वाढल्याने त्यांना १० नोव्हेंबर रोजी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात (H N Reliance Hospital) दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ठाकरे यांनी दुखण्याची माहिती जाहिर आवाहनातून जनतेला दिली होती.
डॉक्टरांनी मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता रुग्णालयात दाखल होवून उपचार घ्या असे सुचवल्याने रुग्णालयातच उपचार घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या जाहिर आवाहनात स्पष्ट केले होते.
त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी त्यांच्या तपासण्या होऊन १२ नोव्हेंबर शुक्रवारी सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई (Dr Ajit Desai) आणि डॉ. शेखर भोजराज (Spine Surgeon) यांनी दिली आहे.
या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती असे सांगण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले. डॉ. अजित देसाई हे हृदयरोग तज्ज्ञ असून डॉ. शेखर भोजराज (Dr Shekhar Bhojraj) हे स्पाईन (पाठीचा कणा) सर्जन (शल्यचिकित्सक) असल्याचे सांगण्यात आले.
सध्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी (Physiotherapy) सुरू असून त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.