मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार टिका
Twitter: @maharashtracity
मुंबई: ’विरोधी पक्षात आम्ही देखील होतो. मात्र असा कुमकुवत विरोधी पक्ष पाहिला नाही. विरोधी पक्ष कुमकुवत असला तरी त्यांचा मान ठेवणार, जनतेचे प्रश्न सभागृहात मांडता येत नसलेला हा विरोधी पक्ष आहे. त्यांनी समस्या ग्रंथरुपाने मांडल्या आहेत, असे सांगत सध्या राज्यात पाऊस फार कमी प्रमाणात असून शेतकरी, कष्टकरी, पेरण्या, दुबार पेरण्या असे अनेक प्रश्न आहेत. मात्र विरोधी पक्षाला प्रश्न मांडता आले नाहीत. आत्मविश्वास आणि अवसान गळालेला विरोधी पक्ष दिसून येत असल्याची टिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते.
मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांसह या परिषदेला चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. शिंदे पुढे म्हणाले की, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. चहापान कार्यक्रमात राज्याचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केला जातो. मात्र जे प्रश्न पाठवले ते ग्रंथरुपाने आहेत. अवसान आणि आत्मविश्वास गळाल्याप्रमाणे विरोधी पक्ष दिसून येत आहे.
ते पुढे म्हणाले, सरकारला अजित पवार यांचा पाठींबा मिळाल्यापासून तर तिकडे अधिक तारांबळ उडाली आहे. त्यातून अशी परिस्थिती ओढवली आहे. विरोधी पक्षाने अधिकाराने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे आवश्यक आहे. मात्र दुर्दैवाने तसे दिसून येत नाही.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पावसावर चर्चा झाली. चर्चेत राज्यात झालेल्या दुबार पेरण्या कराव्या लागतील का, तसेच पाऊस पाणी, धरणातील जलसाठा यावर चर्चा झाली. शेतकऱ्यांसह कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही, असे शिंदे म्हणाले. सरकार ताकदीने उभे असून सरकारमध्ये अनुभवी मंत्री आहेत. लोकशाहीत ज्या पद्धतीने वागले पाहिजे तसेच वागून सरकारची जबाबदारी समजत आहोत. विरोधी पक्ष कुमकुवत असला तरी दुय्यम स्थान देणार नाही, असे शिंदे म्हणाले.
दरम्यान राज्यात मेगा टेक्सटाईल पार्क आले असून ते मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी केंद्राला निवेदन दिल्याची आठवण शिंदे यांनी करुन दिली. शिवाय समृद्धी महामार्गाची जबादारी दादा भुसेंना दिली असून यावर अपघात होऊ नयेत, यासाठी जे हवे ते करण्यात येईल. आम्ही फक्त आमच्या कुटुंबांची काळजी घेत नसून सर्वांची काळजी घेतो, असे सांगत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला मारला.
चांगले काम करताना कोणाला पोटदुखी होत असेल तर आपला दवाखाना सुरु केला आहे. लोकांना सकाळीच तो भोंगा दाखवू नका. योजनांचा भोंगा दाखवा. ७० लाख लोकांना शासन आपल्या दारी योजनेचा फायदा झाला असल्याचे शिंदे म्हणाले.
तिघे एकत्र येऊन कुटनिती करणार: देवेंद्र फडणवीस
राज्यात मोदींच्या नेतृत्वामुळे स्थित्यंतर झाले आहे. मोदींच्या मागे देशासाठी उभे राहण्यासाठी लोक आमच्यासोबत येत आहेत. शिंदे आणि आम्ही तर एकत्र निवडणूका लढवल्या. त्यांचे येणे हे स्वगृही परतण्याचा हा कार्यक्रम होता. मोदींना ताकद देण्यसाठी सर्व एकत्र आले आहेत. देश आणि महाराष्ट्र मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. आता आम्ही तिघे एकत्र येऊन कुटनिती करणार असल्याचे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पत्रकार परिषदेत अजित पवार भाजपासोबत आल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस बोलत होते.
दरम्यान, राज्यात बेपत्ता झालेल्या मुली परत येण्याचे प्रमाण ९५ टक्के असून ६ हजार मुली बेपत्ता असल्याचे भडक वक्तव्य केले जात असल्याचे फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षाच्या वतीने देण्यात आलेले पत्र हे ग्रंथरुप असल्याचे सांगत विरोधी पक्षाला विषयच माहित नाही. यात बहुतांश लक्षवेधी असल्याचे ते म्हणाले.
सरकारची ताकद वाढली आहे. मात्र शक्तीचा दुरुपयोग न करता लोकांना न्याय देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. पेरण्यांवर लक्ष ठेवून आहे. याचे प्रतिबिंब विधानसभेच्या चर्चेतून दिसून येईल. तसेच शक्ति कायदा केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. लवकरच करु एवढे फडणवीस म्हणाले.
राज्यातील प्रश्नांना प्राधान्य: अजित पवार
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सभागृहात सत्ताधाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात येणार असून लोकशाहीचे सर्व आयुध वापरली जातील. त्यातून कामकाजात राज्यातील प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल. अधिवेशनाचे कामकाज कसे रेटून नेण्यात येईल असे न पाहता प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच राज्यातील प्रश्न आपुलकीतून सोडविण्यात येईल. तीन आठवड्याच्या या कालावधीत समस्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या राज्यात पेरण्या आणि धरणांची स्थिती समाधानकारक नाही. हवामान खात्याच्या अंदाजाने राज्यात चांगला पाऊस पडेल असे वाटत असल्याची आशा पवार यांनी व्यक्त केली.
महिलांच्या अपमान करण्याच्या घटनांमधील काही प्रकरणात खोलात गेल्यास काहीच नसल्याचे दिसून आल्याचे पवार म्हणाले. तरीही आम्ही चौकशी करतो. मागच्या घटनेचे समर्थन कोणीच करणार नाही. राज्यात तशी पुनरावृत्तीही घडली नाही. महिलांना अपशब्द मंत्र्यांकडून बोलले जाणार नाहीत, असे सांगत प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांनी त्यांची- त्यांची भूमिका मांडली असल्याचे सांगत हे व्यासपीठ त्या मुद्यावर बोलण्यासाठी नसल्याचे स्पष्ट केले.