परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची कडाडून टीका

@maharashtracity

मुंबई: विधान परिषदेत सोमवारी २५ हजार ८२६ कोटी ७२ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या (supplementary demands) सरकारकडून सादर करण्यात आल्या. यात ४ हजार ५०७ कोटी ७७ लाख रुपयांच्या मागण्या अनिवार्य असून २० हजार ५२४ कोटी ४ लाख रुपयांच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत आहेत. तर ७९४ कोटी ९१ लाख रुपयांच्या मागण्यांसाठी केंद्राकडून अर्थसहाय्य उपलब्ध आहेत.

दरम्यान, यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा ५ लाख ६८ हजार ७० कोटींचा आहे. याचा उल्लेख करत विरोधी बाकावरून टीका करण्यात आली. या मागण्या मूठभर लोकांच्या हितासाठी असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली. संबंधित खात्याचे मंत्री मंगळवारी सकाळी पुरवण्या मागण्यावर उत्तरे देणार आहेत.

भाजप सदस्य प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, सरकारने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्याचप्रमाणे जनतेच्या दृष्टिकोनातून काही तरतूदी करणे गरजेचे असल्यामुळे या अधिवेशनात २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या, असे सांगून या मागण्यांना पाठिंबा असल्याचे दरेकर म्हणाले.

मी विरोधी पक्ष नेता असताना गेल्या सहा अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi government) पुरवणी मागण्यांचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. मूळ अर्थसंकल्पाच्या 20 ते 22 टक्क्यांपर्यंत पुरवणी मागण्या मागील अडीच वर्षाच्या काळात मांडल्या गेल्या होत्या, याची आठवण दरेकर यांनी करून दिली.

राज्य सरकारने मांडलेल्या पुरवणी मागण्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबदास दानवे यांनी जोरदार टीका केली. या पुरवणी मागण्या काहीच लोकांच्या हिताच्या असल्याचे दानवे म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून मराठवाडा संग्रामला (Marathwada Sangram) देखील ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मराठवाड्याला स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी दानवे यांनी केली.

तसेच राज्यातील रॅपिड रेस्क्यू युनिट (Rapid Rescue Unit) व्हावे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, ग्रामपंचायतींमधील इ-ग्राम कक्षातील ऑपरेटरना अद्याप वेळेत मानधन दिले जात नसून ६ महिने अगोदर उचल घेणाऱ्या कंपनीची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली. तसेच, टीईटी घोटाळ्यातील संबंधितांची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here