Twitter : @Rav2Sachin
मुंबई
वंचित बहुजन आघाडी आणि भारत राष्ट्र समिति (बीआरएस) या दोन पक्षात युती संदर्भात बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यात काही तथ्य नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, बीआरएसकडून युती संदर्भात प्रस्ताव आल्यास वंचित बहुजन आघाडी नक्कीच त्याचा विचार करेल, असेही ते म्हणाले.
पुढील वर्षी तेलंगणा राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आणि पुढील वर्षी महाराष्ट्रात होणाऱ्या लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीत बीआरएससोबत युती करण्याबाबत सध्या तरी कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू नाही. तसेच बीआरएसकडून अद्याप कोणताही तसा प्रस्ताव आलेला नाही, असे मोकळे म्हणाले.
तेलंगणा सरकारच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी बाबासाहेबांचे नातू ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. बाळासाहेब आंबेडकर कार्यक्रमास उपस्थित होते. मात्र त्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा सिद्धार्थ मोकळे यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा उभारल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो, असे ते म्हणाले.
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे प्रमुख के चंद्रशेखर राव उर्फ केसीआर यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकारने राज्यातील प्रत्येक क्षेत्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी प्रशंसनीय कार्य केले आहे. संभाव्य राजकीय युतीसाठी बीआरएसने पुढाकार घेतल्यास, वंचित बहुजन आघाडी त्याबद्दल निश्चितपणे विचार करेल; बीआरएसचा मताचा वाटा, लोकप्रियता आणि वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक अजेंडाला चालना देण्यासाठी बीआरएस काय करू शकते, यासारखे अनेक घटक युती संदर्भात निर्णय घेताना विचारात घेतले जातील आणि ते निर्णायक ठरतील, असे सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.
तेलंगणातील निवडणुकीत त्यांना मदत करण्यासाठी आमच्याकडे मतदारांचे संख्याबळ आहे, पण बीआरएस हा वंचित बहुजन आघाडीसाठी महाराष्ट्रात किती उपयुक्त सहयोगी असू शकतो, हा ही आमच्यासमोर प्रश्न आहे. मात्र बीआरएसचाकडून युती संदर्भात प्रस्ताव आल्यास वंचित बहुजन आघाडी नक्कीच त्याचा विचार करेल, असे ही ते म्हणाले.