Twitter: @maharashtracity
मुंबई: विधान परिषदेतील शिवसेनेच्या सदस्या प्राध्यापक मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे संख्याबळ आणखी एकाने कमी झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांचा पक्ष विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार असल्याचे वक्तव्य केले असले तरी महाविकास आघाडीत फूट पडू नये, म्हणून तूर्तास तरी विरोधी पक्ष नेते पदावर दावा न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची माहिती याच पक्षाच्या एका नेत्याने दिली. त्यामुळे तूर्तास तरी शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्याकडील विरोधी पक्ष नेते पदाला जीवदान मिळाल्याचे म्हटले जात आहे.
मनीषा कायंदे यांनी गट बदलल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे विधान परिषदेतील संख्याबळ नऊ झाले आहे. वरिष्ठ सभागृहातील चार अपक्ष सदस्यांपैकी प्रत्येकी एकाचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पाठिंबा असल्याने दोघांचे संख्याबळ सम – समान 10 झाले आहे.
विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे एकूण 11 सदस्य आहेत. त्यापैकी विप्लव बजोरिया यांनी या आधीच शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने उद्धव सेनेचे संख्याबळ एकने कमी झाले होते. त्यात रविवारी मनीषा कायदे यांची भर पडली. त्यामुळे परिषदेतील शिवसेनेची संख्या आता नऊ झाली आहे. राष्ट्रवादीचे देखील नऊ सदस्य आहेत.
परिषदेतील नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले किशोर दराडे यांचा शिवसेनेला पाठिंबा आहे. तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले किरण सरनाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी अजून तरी कुठल्याही पक्षाला थेट पाठिंबा दिलेला नाही. चौथे अपक्ष सदस्य सुधाकर अडबाले हे काँग्रेस सोबत आहेत.
जनता दल युनायटेड पक्षाकडून निवडून आलेले कपिल पाटील यांची भूमिका तळ्यात- मळ्यात असते. त्यांचा पाठिंबा काँग्रेसला, राष्ट्रवादीला की शिवसेनेला याबद्दल ठामपणे सांगता येत नाही. शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राहिला आहे. तर भाजपसोबत मतभेद असले तरीही राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे भाजप सोबतच जातात.
परिषदेत भाजपाचे 22 सदस्य आहेत तर काँग्रेसचे आठ सदस्य आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आता दोन सदस्य परिषदेमध्ये झाले आहेत. विरोधी गटाकडील ज्या पक्षाचे स्वतःचे सर्वाधिक सदस्य असतात, त्याच पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिले जाते, हा विधिमंडळाचा नियम असल्याने या नियमानुसारच उद्धव ठाकरे शिवसेनेकडे विरोधी पक्षनेते पद आले होते आणि अंबादास दानवे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदी आहेत.
उद्धव ठाकरे गटाकडून आणखी कोणी आमदार पक्ष सोडून गेला तर परिषदेतील शिवसेनेचे संख्याबळ कमी होईल, अशावेळी सर्वाधिक सदस्य संख्या ही राष्ट्रवादीकडे असेल आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद येऊ शकेल. सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे समसमान सदस्य संख्या असल्यामुळे विरोधी पक्षनेते पद बदलण्याचा प्रश्नच येत नाही आणि आता शिवसेनेला डिवचण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा नाही.
येणाऱ्या काळामध्ये लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत. अशावेळी उगीच शिवसेनेला डिवचुन महाविकास आघाडीमध्ये मतभेद होतील आणि आघाडीची बिघाडी होईल असे कुठलेही पाऊल राष्ट्रवादी काँग्रेसकडून उचलले जाणार नाही, असे मत राष्ट्रवादीतील एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकनाथ खडसे यांच्यासारखा ज्येष्ठ नेता असून शिवसेनेचे संख्याबळ कमी झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष नेते पदावर दावा करेल आणि खडसे यांना विरोधी पक्षनेते दिले जाईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. तर विधान सभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संख्या बळाबाबत माहिती घ्यावी लागेल, असे सांगितले. मात्र त्यांनी अशीही पुष्टी जोडली की ज्याचे संख्याबळ जास्त असते त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद जाते.
तूर्तास तरी अंबादास दानवे यांच्याकडील विरोधी पक्षनेतेपद कायम राहणार असून त्यांना जीवदान मिळाल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले.