By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: अलीकडे जे सर्व्हे छापून येत आहेत, त्या सर्व्हेमध्ये काही तथ्य दिसत नाही. कारण आमच्या पक्षानेदेखील खाजगी स्तरावर काही निवडक मतदारसंघाचा सर्व्हे केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात एक मोठा पक्ष आणि लोकांचा अधिक पाठिंबा असणारा पक्ष म्हणून पुढे येत आहे, हाच निष्कर्ष आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये पार पडली. त्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीने केलेल्या सर्व्हेत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अनेक मतदारसंघात अतिशय बळकट आहेत. मात्र, काही असत्यावर आधारित सर्व्हेच्या बातम्या महाराष्ट्रात येत आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीने केलेल्या काही मतदारसंघातील सर्व्हेची माहिती बैठकीत अवगत केल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

कुठला आमदार येणार आणि कुठला आमदार येणार नाही, अशी चर्चा आहे, त्याच मतदारसंघातील सर्व्हेची माहिती आणि आपल्या आमदारांची काय स्थिती आहे ही माहितीही जयंत पाटील यांनी बैठकीत समोर ठेवली.

आम्ही २८८ जागांचा सर्व्हे केला नाही. आम्ही लढवू शकतो त्याच जागांचा सर्व्हे केला आहे. येवला, बारामती किंवा कराडचा सर्व्हे करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. ज्याठिकाणी आवश्यकता आहे अशा निवडक ठिकाणी सर्व्हे केला असून त्याठिकाणी फार चांगली परिस्थिती आहे, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

या बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झालेले खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाऊस लांबला आहे. पेरण्या दुबार करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. पेरण्या करायच्या की नाही यादेखील समस्येत राज्यातील शेतकरी आहेत. पिण्याच्या पाण्याच्या समस्येने फार मोठे संकट निर्माण होणार आहे. या सगळ्या गोष्टींची चर्चा आणि वेगवेगळ्या भागाची चर्चा या बैठकीत करण्यात आली. शिवाय विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी आपापली मते मांडली. याशिवाय अनेकांनी त्यांच्या भागातील प्रश्नही मांडले, असेही

 जयंत पाटील यांनी सांगितले.

संजय शिरसाट पेक्षा माझी जास्त विश्वासार्हता आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मला विचारता, हे जास्तच झाले,असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

गद्दार दिवसाचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसने केले. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली होती. आंदोलन करण्यात येऊ नये म्हणून त्यांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले. आता महाराष्ट्रात आंदोलन करायला परवानगी नाही. सरकार विरोधी कुणी बोलू नये, अशी मानसिकता ठेवून पोलिसांचा वापर आंदोलन चिरडण्यासाठी सर्रास सुरू आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here