एडवोकेट अमोल मातेले यांचा सहवाल
Twitter : @maharashtracity
मुंबई: रायगड, नांदेड, लातूर ,ठाणे, तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हिंसाचार, राज्यात महिलांवरील बलात्काराच्या वाढत्या घटना, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, त्यामुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यात खोके देऊन फक्त आमदार, खासदार विकत घेण्याचं सरकारचे धोरण आहे. राज्यात आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालं आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी केला.
पुण्याच्या वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडाच्या पायथ्याशी रविवारी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिची हत्या होणं महाराष्ट्र साठी अतिशय दुर्दैवी बाब आहे. त्याच सोबत गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईत वस्तीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीची हत्या झाली. तर नुकतंच लोकलमध्ये महिला डब्यात एका तरुणानं मुलीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात जातीयवादी गावगुंडांनी अक्षय भालेराव या तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना ताजी असतानाच लातूरमधील रेणापूर येथे सावकाराकडून फक्त तीन हजार रुपयांसाठी एका दलित व्यक्तीची डोळ्यात मिरचीपूड टाकून बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. हे सगळं कमी म्हणून काय तर मीरारोड येथील एका गृहस्थाने त्याची पार्टनर सरस्वती हीचा निर्घृन खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले, त्यांना नष्ट करण्यासाठी ते कुकरमध्ये शिजवले, या घटना पुरोगामी महाराष्ट्राला व मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे एडवोकेट अमोल मातेले यांनी सांगितले.
“राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीही महिलांबाबत असंवेदनशील आहे. या घटना राज्याला अस्वस्थ करणाऱ्या असल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचं स्पष्ट होत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ असे बीजेपेचे धोरण असलं तरी त्यांच्या राज्यात महिला, माता, भगिनी सुरक्षित नाही हे वारंवार स्पष्ट होत आहे. या सगळ्या घटना पाहता थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी एडवोकेट अमोल मातेले यांनी केली आहे.