- खासदार सुनील तटकरे यांनी केला विश्वास व्यक्त
By Milind Mane
Twitter: @milindmane70
महाड: राज्यात सुरू असलेल्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत 100% यश मिळाले पाहिजे, अशा सुचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत. महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. त्याचाच एक भाग म्हणून कोकण शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीला पहिल्यासारखे निर्विवाद यश मिळेल, असा दावा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
तटकरे म्हणाले, राज्यात शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत असून या निवडणुकीत शंभर टक्के यश मिळाले पाहिजे अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्या असल्याने आम्ही त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात आहोत. कोकण शिक्षक मतदार संघाची स्थापना झाल्यापासून या मतदारसंघात एका विशिष्ट विचारसरणीला यश त्या ठिकाणी मिळाले होते. पण सहा वर्षांपूर्वी आम्ही सर्वजण एकत्र आलो व आम्ही या मतदारसंघांमध्ये बाळाराम पाटील यांना निर्विवादपणे निवडून आणले.
कोकण शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत असताना बाळाराम पाटील यांनी शैक्षणिक संस्थांचे व विशेष करून सबंध शिक्षक वर्गाच्या समस्या सातत्याने विधिमंडळात मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांच्या आमदार निधीतून तसेच वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच उत्तम दर्जेदार शिक्षण कसे देता येईल, याचा देखील त्यांनी प्रयत्न केला असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी केवळ दोन दिवसाचा अवधी उरला असून या दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत जास्तीत जास्त संपर्क साधून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना सर्वाधिक मतदान कशा पद्धतीने होईल, याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पहिल्यासारखेच निर्विवाद यश मिळेल, असा दावा खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी केला.
यावेळी काँग्रेसतर्फे हनुमंत जगताप, शिवसेनेकडून बाळ राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंटी देशमुख उपस्थित होते.