प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची सरकारवर प्रखर टीका……..

@maharashtracity

By अनंत नलावडे

मुंबई: राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने ‘आत्महत्यामुक्त’ महाराष्ट्र करु अशी घोषणा केली. मात्र, त्याचदिवशी एका शेतकऱ्याने विधानभवन परिसरामध्ये पेटवून घेतले. दुसरीकडे शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. मात्र, अद्याप मदत मिळालेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली, त्याकडे दुर्लक्ष केले. हे शिंदे सरकार (Shinde Sarkar) फक्त घोषणा सरकार असल्याची प्रखर टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर बगल देण्याचे काम होत असून शिंदे सरकारमध्ये मंत्र्यांची कमतरता, पालकमंत्र्यांची न झालेली नेमणूक व कॅबिनेटचा रखडलेला विस्तार हे सगळे विषय पडून असून त्याचा नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे, असा आरोपही तपासे यांनी केला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi government) अर्थमंत्री राहिलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळे वित्तीय तूट ३ टक्क्यापेक्षा कमी ठेवण्यात यश आले. त्यामुळे कॅगच्या अहवालात त्यांचे कौतुक करण्यात आल्याचेही तपासे यांनी आवर्जून सांगितले.

मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC polls) डोळ्यासमोर ठेवून भाजप जाणूनबुजून जातीय तेढ निर्माण कशी होईल, हा प्रयत्न करत आहे. ३० जुलै २०१५ मध्ये नागपूरमध्ये याकूब मेमनला फाशी देण्यात आली. त्यावेळी कुणाचे सरकार होते? याकूब मेमन (Yakub Memon) याचे शव कुणाच्या सरकारने नातेवाईकांना दिले हे सांगण्याची गरज नाही, असा टोलाही तपासे यांनी यावेळी लगावला.

भाजप खोटेनाटे आरोप करुन महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र करत आहे. याकुब मेमन प्रकरणी भाजप उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव वापरत आहेत. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून भाजप आमदार राम कदम यांनी जाणीवपूर्वक जुना फोटो ट्वीट केला आहे, हे दुर्दैवी असल्याचेही तपासे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन ११ सप्टेंबरला दिल्लीत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन दिल्ली येथे १० व ११ सप्टेंबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनात संघटनात्मक बांधणी, बदल, देशातील राज्यांच्या निवडणूका यावर चर्चा होणार असल्याची माहितीही तपासे यांनी दिली.

यावेळी होणार्‍या राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणूकीची सविस्तर माहिती पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन वर्ष कोरोना काळात ही निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे त्याची मुदतवाढ मागण्यात आली होती. त्यानुसार १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कॉन्स्टीट्यूशन क्लब, नवी दिल्ली येथे विस्तारीत कार्यकारिणीची सभा होणार आहे. त्यानंतर तालकटोरा स्टेडियमवर ११ सप्टेंबरला हे आठवे अधिवेशन होणार आहे. महाराष्ट्रात काही अडचणींमुळे राज्याची निवडणूक लांबली आहे. त्यामुळे सभासद नोंदणीसाठी महाराष्ट्राने आणखी कालावधी लागेल अशी विनंती केली. त्यानुसार २० सप्टेंबरपर्यंत राज्यातील नोंदणी वाढवली आहे. त्यानंतर राज्यातील निवडणूक प्रक्रिया होईल, तशी मुदतवाढ केंद्रीय समितीने दिली असल्याचेही टकले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here