शरद पवार यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
By अनंत नलावडे
Twitter : @NalavadeAnant
मुंबई: एखाद्या रेल्वेचे, रस्त्याचे किंवा हॉस्पिटलचे उद्घाटन करणे, हे सरकारी कार्यक्रम आहेत. अशा सरकारी कार्यक्रमांचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान (PM Narendra Modi) करतात तेव्हा सरकारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणे कितपत शहाणपणाचं आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
मी आतापर्यंत अनेक पंतप्रधानांचे कार्यक्रम पाहिले आहेत, भाषणे ऐकली आहेत. अगदी पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यापासून त्यानंतरच्या वेगवेगळ्या पंतप्रधानांना ऐकले आहे. पंडित नेहरू निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यावर त्यांनी विरोधी पक्षाचे सरकार असतानाही त्यांच्यावर कधी टिप्पणी केली नव्हती. त्यांनी आपली भूमिका मांडली. विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष या लोकशाहीच्या संस्था आहेत. त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि हे संकेत आपल्या देशाच्या जवळपास प्रत्येक पंतप्रधानांनी पाळले. पण आज काही हे पाळले जात नाही, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, रविवारी नागपूर येथील विविध लोकार्पणच्या कार्यक्रमात विरोधी पक्षावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. याचा संदर्भ घेऊन पवार म्हणाले, काल, नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. या भाषणात त्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोधकांवर टीका केली. ते पक्षाच्यावतीने किंवा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरसभेसाठी गेले, त्याठिकाणी त्यांनी पक्षाची भूमिका मांडली किंवा विरोधकांवर टीका टिप्पणी केली, तर तो त्यांचा १०० टक्के अधिकार आहे. पण एखाद्या शासकीय कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणे कितपत योग्य आहे? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.
नागपूरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काही गोष्टी सांगितल्या. समृद्धी रस्त्याला (Samruddhi Corridor) विरोधकांनी विरोध केला, असा आरोप झाला. मला माहिती नाही कुणी विरोध केला. पण मी औरंगाबादला (Aurangabad) गेलो असताना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. हा जो रस्ता होतोय त्यामध्ये जमीन जात आहे. सरकर या जमिनीची रास्त किंमत देत नाही, हे ऐकल्यानंतर मी स्वतः त्यावेळी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. हा विकासाचा प्रकल्प आहे, तो होत असेल तर त्याला शेतकऱ्यांचा विरोध नाही. परंतु ज्यांच्या जमिनी घेत आहात त्यांचे आयुष्य आणि उत्पन्नाचे साधन आहे, त्यांना रास्त किंमत द्या म्हणजे त्यांना सन्मानाने जगता येईल, असे मी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यांना सूचवले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कधीही समृद्धी महामार्गाला विरोध केला नाही, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील यांना सुनावले
शाईफेकीचे आम्ही कधीही समर्थन करणार नाही. परंतु शाईफेक झाल्यावर उच्च शिक्षणमंत्री बोलले नसते तर असा प्रकार झाला नसता. त्यांनी फुले, आंबेडकर, कर्मवीर यांचा उल्लेख केला. फुले आणि आंबेडकरांचे जीवन संपूर्ण देशाला माहित आहे. भाऊराव पाटील यांनी आपले आयुष्य ज्ञानादानासाठी घालवले. पैसे नसताना आपल्या पत्नीचे दागिने विकून शिकणार्या मुलांचे दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली याची आठवण पवार यांनी करून दिली. ‘कमवा आणि शिका’ हे ब्रीद वाक्य असलेल्या रयतमध्ये मी अध्यक्ष आहे. गेली ५० वर्षे त्या संस्थेत महत्त्वाच्या जबाबदारीवर आम्ही काम करतो आहोत. हे काम करत असताना आम्ही राजकीय पक्षाचे जोडे कधी घालत नाही. तिथे सामान्य कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाचे दालन कसे खुले राहिल, त्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल असा प्रयत्न असतो. अशा संस्था किंवा महात्मा फुले, आंबेडकरांबाबत बोलताना भीक मागणे हा शब्द वापरला नसता तर असे घडले नसते. परंतु, लगेच त्यांनी गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून दाखवले. मंत्रिमंडळात मंत्री होतात, अध्यक्ष होतात, आताही मंत्री आहात आणि सामान्य कुटुंबातील व्यक्ती ही सत्तेपर्यंत पोचलेले उदाहरण तुमचेच आहे का? असा प्रश्नही पवार यांनी केला.
महाराष्ट्राचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया
आपण एकसंघ राहूया आणि राज्य सर्वदृष्टीने पुढे नेण्यासाठी जे – जे काही करता येईल ते अखंडपणाने करत राहू. देशातील महत्वाचे राज्य म्हणून राज्याचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया आणि त्यासाठी सर्वांची साथ मिळेल, अशी अपेक्षाही पवार यांनी यावेळी व्यक्त केली.