@maharashtracity

पुणे: पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation – PMC) भारतीय जनता पार्टीकडून ताब्यात घेण्याचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस पाहत असली तरी त्या पक्षाच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल आणि भाजपा पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवेल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांनी पुण्याजवळ मांजरी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पुणे महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा वापर करून महानगरपालिकेत नव्याने काही गावांचा समावेश केला. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ झालेले मतदार गावांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे भाजपालाच मते मिळतील.

पुण्यात प्रभाग रचना करताना मोठ्या प्रमाणात मोडतोड केली असली तरी भाजपाचा मतदार सर्वत्र कायमच आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक भाजपा पूर्ण बहुमताने जिंकेल आणि पुणे महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, भाजपाने पाच वर्षांच्या सत्तेच्या काळात पुणे महानगरपालिका क्षेत्रात भरघोस कामगिरी केली आहे. मेट्रो, रुग्णालय, रस्ते, बस वाहतूक अशा विविध क्षेत्रात भाजपाने प्रभावी काम केले आहे. आगामी काळात पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविद्यालयही होईल. भाजपा आपल्या कामांची यादी घेऊन मतदारांसमोर जाईल आणि त्यापूर्वी पन्नास वर्षांच्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress) कारभाराशी तुलना करण्याचे आवाहन करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here