@maharashtracity

मुंबई: भारतीय जनता पक्षाने धनगर, मराठा समाजाची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक बंजारा समाजाचीही केली आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामजी जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

२०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यानंतर बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षण देतो असे लेखी आश्वासन दिले होते. पण आजपर्यंत त्यांनी तो शब्द पाळला नाही. बंजारा समाजाची फसवणूक करून समाजाच्या दैवतांचा मोदींनी घोर अपमान केला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

नाना पटोले म्हणाले की, स्व. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांचे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी राज्यात ऊर्जा प्रकल्पांची निर्मिती करून राज्याला प्रकाशात आणले. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती झाली.

यावेळी आ. राजेश राठोड म्हणाले, बंजारा टायगर फोर्सच्या काँग्रेस पक्षातील विलीनीकरणामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. भाजपचा खरा चेहरा आता बंजारा समाजासमोर आला असून बंजारा समाज भाजपला थारा देणार नाही असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here