By अनंत नलावडे

@maharashtracity

मुंबई: प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. सरकारला जाब विचारणे, त्यांच्या धोरणांवर टीका करणे हे त्यांचे कामच आहे. परंतु, लोकशाही व संविधानाला न मानणाऱ्या भाजपने पत्रकारांना HMV (His Masters Voice) असे संबोधित करून गुलामाची उपमा देणे हा दबाव टाकण्याचा अश्लाघ्य प्रकार आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडूनच असा प्रकार होत असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून भाजपा व देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

पटोले म्हणाले की, २०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सर्वच यंत्रणांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. सरकारच्या इशाऱ्यावर त्यांना नाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रसारमाध्यमे ही लोकशाही शासन प्रणालीत जागल्याचे काम करत असतात. समाजाच्या हितासाठी ते काम करत असतात, सरकारवर टीका केली, सरकारला जाब विचारला तर माध्यमांचे काय चुकले? पण सत्तेचा कैफ चढला की टीकाही सहन होत नाही. म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांचा HMV असा उल्लेख करणे व त्याच पक्षाचा आमदार पराग शहा पत्रकारांना चाय – बिस्कुटवाले म्हणत अपमान करतो, ही सत्तेची मस्ती चढल्याचा प्रकार आहे. सरकारकडून पत्रकार व प्रसार माध्यमांवर दबाव टाकण्याच्या या प्रकाराचा काँग्रेस पक्ष निषेध करत असून प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य व त्यांच्या हक्कासाठी काँग्रेस सदैव त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

शिवप्रतिष्ठाचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनीही एका महिला पत्रकाराला ‘आधी कुंकू लाव मग तुझाशी बोलतो’, असे म्हणत जाहीर अपमान केला. महिलेचे कर्तृत्व कुंकू लावण्याने सिद्ध होते का? तिचे काम व कुंकू याचा काय संबंध आहे? संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराचा केलेला अपमान हा समस्त महिला वर्गाचा अपमान आहे. महिलेला तुच्छ लेखणाऱ्या अहंकारी पुरुषी मानसिकतेतून आलेला हा प्रकार असून भिडे ही समाजातली विकृत्ती आहे. अशा विकृत्तीला आळा घातला पाहिजे. परंतु, पुरोगामी महाराष्ट्राच्या मंत्रालयात अशा विकृत्तींना मानाचे स्थान दिले जाते हे त्याहून दुर्दैवी आहे. महाराष्ट्राला आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे यांच्यासारख्या थोर व महान पत्रकारांचा वारसा लाभलेला आहे. याच महाराष्ट्रात पत्रकारांचा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सत्ताधा-यांकडून अपमान केला जात आहे हे योग्य नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here