मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्यांचे नागपूर कनेक्शन – सचिन सावंत

0
329

@maharashtracity

मुंबई: मराठा आरक्षणाविरोधात (Maratha reservation) न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन (Save Merit Save Nation) या संस्थेचे व त्यांच्या पदाधिका-यांचे भाजप (BJP) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नागपूर (Nagpur) कनेक्शन उघड झाले आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते आणि
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.

यात भाजप पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षण विरोधी लोकं व संस्थांना रसद पुरवून भाजपानेच मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे का? असा संतप्त सवाल सावंत यांनी केला आहे.

जनतेची दिशाभूल करण्याकरिता ५ जूनला भाजप पुरस्कृत आंदोलनामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार उडाला तर त्याला सर्वस्वी सुपर स्प्रेडर भाजपा जबाबदार असेल, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.

सावंत म्हणाले की, भाजपची मानसिकता संघ विचारधारेप्रमाणेच आरक्षण विरोधी आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असा दिखावा करायचा आणि प्रत्यक्षात मात्र आरक्षण मिळू नये म्हणून मोहिमा चालवायच्या ही भाजपची कार्यपद्धती आहे.

सर्वोच्च न्यायालयात आरक्षणविरोधी लढाई लढणारे सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या संघटनेचे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कनेक्शन आहे. या संस्थेतील बहुसंख्य विश्वस्त हे आरएसएसशी संबंधित असून नागपूरचेच आहेत. त्याचबरोबर भाजपाच्या संघाच्या कार्यामध्येही ते अग्रेसर असतात याचेही पुरावे समोर आले आहेत.

CAA कायद्याला पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी भाजपच्या व्यासपीठावर होती. त्यापेक्षा गंभीर बाब ही की, या संस्थेचे संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे पूर्व विदर्भातील (Vidarbha) समन्वयक आहेत. त्यांनी स्वतःचा पत्ता या संस्थेचा पत्ता म्हणून नोंदवलेला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीच त्यांची समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) ही न्यायालयीन लढाई चालली होती त्यावेळी ही संस्था अस्तित्वात नव्हती. परंतु मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर या संस्थेचे कामकाज सुरु झाले आणि ही संस्था प्रमुख्याने मराठा आरक्षण विरोधातच कार्यरत आहे असे कागदपत्रावरून दिसते. मराठा आरक्षण विरोधात चार याचिकाकर्ते या संस्थेने पाठवले असे या संस्थेच्या वेबसाईटवर नमूद आहे.

डॉ. अनुप मरार हे मराठा आरक्षणाविरोधात त्यांच्या सहकाऱ्याबरोबर नागपूरमध्ये मोर्चे काढत होते तरीही भाजपा पदाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या संस्थेमार्फत नामवंत वकील मराठा आरक्षणाचा विरोध करण्यासाठी देण्यात आले होते. तसेच डॉ अनुप मरार यांचे देवेंद्र फडणवीस याच्यासह अनेक भाजपा नेत्यांशी संबंध आहेत. हे सर्व पाहता भाजपाने मराठा आरक्षण विरोधात रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली का? याचे उत्तर दिले पाहिजे अशी मागणी सावंत यांनी केली.

कोल्हापूर (Kolhapur) येथे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेच्या कारवायांविरोधात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये (SC) त्यांनी घेतलेल्या आरक्षण विरोधी भूमिकेविरोधात मराठा समाजाच्या आंदोलकांनी मोठे आंदोलन केले. यातून या संस्थेची भूमिका आणि मराठा समाजाचा या संस्थेविरोधातील रोष किती मोठा आहे हे स्पष्ट होते. कोणी वैयक्तिक पातळीवर कोणत्याही प्रश्नावर न्यायालयात जाऊ शकतो पण इथे भाजपाचा पदाधिकारी हा भाजपाच्या नीती नियमांशी बांधील असतो. मग भाजपाने त्याला का थांबवले नाही? यांचे उत्तर मिळाले पाहिजे असेही सावंत म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार आणि फडणवीस सरकार यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला अडथळा निर्माण झाला हे स्पष्ट असताना भाजप जनतेची दिशाभूल करून आपल्या पापांचे खापर महाविकास आघाडीवर (MVA) फोडण्याचा प्रयत्न करत आहे. याकरिता ५ जून रोजी भाजप पुरस्कृत आंदोलन केले जाणार आहे.

भारतीय जनता पक्षाची ख्याती कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून अगोदरच प्रस्थापीत झालेली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना पाच राज्यांच्या निवडणुकीत सत्तापिपासू वृत्तीने भाजपाने मोठमोठ्या सभा व रोड शो करून कोरोनाचा प्रसार केला त्यामुळेच देशात कोरोनाचा हाहाकार उडाला. ५ जूनच्या आंदोलनानंतर जर महाराष्ट्रात कोरोनाचा भडका उडाला तर त्याला सुपर स्प्रेडर भाजपाचे वर्तनच जबाबदार असेल असा इशारा सावंत यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here