Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट, विरोधानंतरही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक उद्या बुधवारी मुंबईत होत आहे. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजप विरोधात महाविकास आघाडीची एकजूट कायम ठेवली होती. मात्र, २ जुलै रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले. मुंबईत सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी अजूनही आपला प्रभाव दाखवू शकलेली नाही. अशातच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार हळूहळू अजित पवार गटात सहभागी होत आहेत. याशिवाय शरद पवार गटाने अजित पवार आणि अन्य आठ मंत्र्यांना अपात्र ठरविण्याच्या प्रश्नावर अद्याप भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे शरद पवार गटाच्या आमदारांमध्ये संभ्रम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक महत्वाची मानली जात आहे.
चर्चगेट येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात संध्याकाळी साडेसात वाजता आघाडीच्या आमदारांची बैठक होईल. या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, उद्धव ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आदी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती या बैठकीचे संयोजक आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी येथे दिली.