काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांची स्पष्टोक्ती
By Anant Nalavade
Twitter : @nalavadeanant
मुंबई: महाविकास आघाडीतील जागावाटप मेरीटनुसारच होईल. सर्व बाजूंचा विचार करुन जागा वाटप होईल आणि मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. प्रत्येक पक्षाने जागांची चाचपणी केली पाहिजे यात काही गैर नाही, असे सांगताना पटोले यांनी प्रदेश काँग्रेसने संभाव्य जागांसाठी समित्या नेमल्याची माहिती दिली. महापुरुषांचा अपमान संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपाला पराभूत करणे यासाठी आमचे काम सुरु आहे, असेही पटोले यांनी यावेळी नमूद केले.
महविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन प्रमुख पक्षांनी आगामी लोकसभा आणि त्यानंतर होऊ घातलेली विधानसभा निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयात जागावाटपाचा मुद्दा अतिशय कळीचा आहे. महाविकास आघाडीत मोठाभाऊ कोण यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर ठाकरे गटाने लोकसभेच्या १९ जागांवर दावा केला आहे. त्यामुळे जागावाटपाची प्रत्यक्ष चर्चा सुरु होण्यापूर्वी आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज येथे पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी जागावाटप मेरीटवर निर्णय होईल,असे सांगितले. तसेच महापुरुषांचा आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपला पराभूत करण्यावर आमचे काम सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भाजपचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले. त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला असून हे सारे संशयास्पद वाटते, अशी शंकाही पटोले यांनी उपस्थित केली.
समीर वानखेडे सरसंघचालकांना भेटल्यानंतर त्यांची चौकशी सुरु होण्याची कारणे काय? या प्रकरणात काही ना काही लपलेले आहे, काही तरी संशयास्पद आहे, किंवा समीर वानखेडे यांच्याकडे काहीतरी अशी माहिती आहे ज्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची पोलखोल ते करु शकतात. तर दुसरीकडे वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु होताच महाराष्ट्रातील भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि इतर काही मंत्री वानखेडेंच्या केसाला धक्का लावला तर पाहून घेऊ, असे म्हणत आहेत. सीबीआय, ईडी या तपास यंत्रणा तर भाजप सरकारच्याच अखत्यारित आहेत. मग वानखेडे यांच्या सीबीआय चौकशीचा भाजपला एवढा त्रास का ? सरकारी अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाणे यात काही ना काही लपलेले आहे, असाही संशय पटोले यांनी व्यक्त केला.